
बाळ तोरसकर,[email protected]
अनेकविध खेळांत हिंदुस्थान बाजी मारतोय… पण आपल्या हॉकीला मात्र एका जादुई स्पर्शाची गरज आहे….
एकेकाळी हॉकीचे सुवर्णयुग अनुभवलेल्या हिंदुस्थानला आता मात्र एका जादूई ‘टचची’ गरज आहे. खरो तर हॉकी हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय खेळ आहे हे म्हणायला मात्र आता आपल्याला थोडे धाडसच ठेवायला लागेल!!! सुरुवातीला या खेळाचे नियम विंबल्डन हॉकी क्लबने व त्यानंतर 1886 साली हॉकी असोसिएशनतर्फे तयार केल्याची नोंद पाहायला मिळते. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना 1895 साली इंग्लंड व आयर्लंड या दोन देशांमध्ये खेळवला गेला होता.
लंडन येथे जगातील सर्वात जुना असा ‘ब्लॅकहेथ’ नावाने पहिला हॉकी क्लब सुरू झाल्याची नोंद इतिहासात आढळते. याच क्लबमध्ये हॉकी या खेळावर संस्कार झाले व तेथूनच हा खेळ ब्रिटिश साम्राज्य जेथे जेथे पसरले होते तेथे तेथे पसरत गेला. त्यामुळेच लंडन येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 1908 साली पहिल्यांदा हॉकीचा समावेश केला गेला. अर्थात त्यावेळी इंग्लंडने अंतिम विजयी होत प्रथम क्रमांक मिळवला तर आयर्लंड उपविजयी ठरला. त्यावेळी स्कॉटलंड व वेल्स अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानी राहिले होते. असे असले तरी 1912 साली व 1924 साली हा खेळ ऑलिंपिकमध्ये खेळवला गेला नाही तर 1916 साली पहिल्या विश्वयुद्धामुळे ही स्पर्धाच होऊ शकली नाही. बेल्जियम येथे 1920 साली झालेल्या ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकदा ग्रेटब्रिटनने प्रथम स्थान मिळवले तर डेन्मार्क, बेल्जियम व फ्रान्स हे अनुक्रमे दुसऱया, तिसऱया व चौथ्या स्थानी राहिले होते.
यानंतर 1928 च्या ऑलिंपिक स्पर्धेपासून मात्र हिंदुस्थानने हॉकी जगतावर डंका वाजवायला सुरुवात केली. त्यावेळी हिंदुस्थान हा ग्रेटब्रिटनच्या अधिपत्याखालील देश म्हणून खेळत होता व या हिंदुस्थान संघाने 1928 बरोबर 1932 व 1936 च्या स्पर्धेतसुद्धा सुवर्णपदक मिळवत हॉकी खेळात वर्चस्व मिळवले. मात्र दुसऱया महायुद्धामुळे 1940 व 1944 साली ऑलिंपिक स्पर्धाच होऊ शकली नाही. त्यानंतर मात्र स्वतंत्र हिंदुस्थानने सलग तीन वेळा (1948, 1952 व 1956) मध्ये सुवर्णपदक मिळवत हॉकी खेळात आपणच दादा असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर मात्र हिंदुस्थानला आतापर्यंत फक्त दोनदाच (1964 व 1980) साली सुवर्णपदकाला गवसणी घालता आली. 1960 साली दुसऱया तर 1968 व 1972 साली तिसऱया स्थानी हिंदुस्थानला समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मात्र हिंदुस्थानला हॉकीतली अधोगतीच पाहायला मिळाली आहे.
अशा या हॉकी खेळाची आपण थोडी अधिक माहिती करून घेऊया. हॉकीचे मैदान 90 मीटर लांब व 55 मीटर रुंद असते. हॉकीच्या चेंडूचे वजन 156 ते 163 ग्रॅम इतके असते तर हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन 12 ते 28 पौंडस् इतके असते. हॉकीचा खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांतील एक एक खेळाडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकी स्टीकवर आदळतात आणि मग खेळाला सुरुवात होते. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणाऱया रेषेला ‘गोल लाइन’ म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱया आणि गोल लाइनला समांतर जाणाऱया मध्य रेषेला फिफ्टी यार्ड लाइन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने चेंडू फेकतो त्या कृतीला पास बॅक असे म्हणतात. याशिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाइन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.
हॉकी हा सांघिक खेळ असून प्रत्येक संघात अकरा खेळाडू खेळतात तर पाच अतिरिक्त खेळाडू असतात व गरजेनुसार ते बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरू शकतात. हॉकीचा सामना 80 मिनिटांचा असतो. त्यामध्ये प्रत्येकी 35 मिनिटांचे दोन डाव व मध्यांतराला दहा मिनिटांची विश्रांती असते. ऑलिंपिकमध्ये बारा देशांनाच प्रवेश दिला जातो व हे बारा देश दोन गटांत विभागले जातात व प्रत्येक संघ इतर पाच संघांबरोबर साखळी पद्धतीने सामने खेळतो. सामना जिंकल्यास तीन गुण व बरोबरीत राहिल्यास एक गुण मिळतो. प्रत्येक गटातले सर्वाधिक गुण मिळवणारे दोन-दोन संघ उपांत्य फेरीत खेळतात व त्यातील विजयी संघ अंतिम फेरीत खेळतात. सामना निर्धारित वेळेत बरोबरीत राहिल्यास 15 मिनिटांचा वेळ अधिक दिला जातो व त्यावेळीही सामना बरोबरीत राहिल्यास पेनल्टी शूटआऊटवर विजेता ठरतो. त्यासाठी प्रत्येक संघाला आळीपाळीने पाच-पाच पेनल्टी स्ट्रोक्स दिले जातात व विजेते होईपर्यंत ही संधी दिली जाते.

























































