
सामना ऑनलाईन । बंगळुरू
श्रेयस अय्यरच्या हिंदुस्थान ‘अ’ संघाने पाहुण्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत चारदिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यावर मजबूत पकड मिळविली आहे. मंगळवारी चौथ्या व निर्णायक दिवशी हिंदुस्थान ‘अ’ संघाला ६ बळी हवे असून दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला विजयासाठी २४० धावांची गरज आहे. तिसर्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने उर्वरित ४० षटकांच्या खेळात ४ बाद ९९ धावांपर्यंत मजल मारली होती. खेळ थांबला तेव्हा झुबयर हमजा ४६, तर रूडी सेकंड ४ धावांवर खेळत होते.
दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला २८६ धावांवर रोखल्यानंतर हिंदुस्थान ‘अ’ संघाने १२९.४ षटकांत ८ बाद ५८४ धावसंख्येवर डाव घोषित करून पहिल्या डावात २९८ धावांची मोठी आघाडी घेतली. रविवारी नाबाद २२० धावांची दमदार खेळी करणारा मयांक अग्रवाल सोमवारी मात्र पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बेउरेन हेन्रीक्सने त्याला पायचीत बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यर २४ धावांवर बाद झाल्यानंतर हनुमान विहारी (५४) व श्रीकार भरत (६४) यांनी शानदार अर्धशतके झळकवली. अक्षर पटेलने नाबाद ३३ धावांची खेळी करून हिंदुस्थान ‘अ’ संघाला पावणेसहाशेचा टप्पा ओलांडून दिला.
हिंदुस्थान ‘अ’ संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाहुण्या संघाची आघाडीची फळी कापून काढत त्यांची ४ बाद ९९ अशी दुर्दशा केली. चारही बळी सिराजनेच मिळविले.






















































