पोलीस अन् तस्करांमध्ये चकमक सुरू असताना चुकून गोळी लागली, हिंदुस्थानी तरुणाचा सौदीमध्ये दुर्दैवी मृत्यू

सौदी अरेबियामध्ये पोलीस आणि तस्करांमध्ये चकमक सुरू असताना चुकून गोळी लागल्याने हिंदुस्थानी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजय कुमार महतो (वय – 27) असे या तरुणाचे नाव असून तो झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील दुधपनिया गावचा रहिवासी होता. हिंदुस्थानी दुतावासाने ही माहिती दिली असून पीडिताच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

मयत विजय कुमार महतो हा हुंडई इंजिनियरिगं अँड कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकरीला होता. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर तो घटनास्थळी काही साहित्य घेण्यासाठी गेला होता. याचवेळी या भागात स्थानिक पोलीस आणि तस्करांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी तिथून जाणाऱ्या विजय कुमार महतो याला पोलिसांची गोळी लागली. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र 24 ऑक्टोबर रोजी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताने या गोळीबाराच्या घटनेबाबत पत्नीला व्हाईस नोट पाठवली होती. यात तो पोलिसांची गोळी चुकून आपल्याला लागल्याचे म्हणतो.

हिंदुस्थानी दुतावासाने आता याबाबत माहिती दिली आहे. सौदी अरेबियामध्ये कामासाठी गेलेल्या हिंदुस्थानी तरुणाचा पोलिसांची गोळी लागून मृत्यू झाला. सौदीमध्ये पोलीस आणि तस्करांमध्ये चकमक सुरू असताना हा प्रकार घडला. विजय कुमार महतो असे मृताचे नाव आहे, अशी माहिती दुतावासाने दिली.

दरम्यान, ही दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर झारखंडच्या डुमरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयराम कुमार महतो यांनी हिंदुस्थानी दुतावास, सौदीचे अधिकारी यांना पत्र लिहून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच विजय कुमार महतो याचा मृतदेह लवकरात लवकर हिंदुस्थानात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करत या कामात आपण कायदेशीर आणि आर्थिक मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विजय कुमार महतो याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर महतो कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विजय याच्या पश्चात पत्नी, दोन मुलं (एक 5 वर्षांचा, दुसरा 3 वर्षांचा) असा परिवार आहे.