
रात्रीच्या रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठय़ा आवाजात गाणी ऐकत, गप्पा मारत इतर प्रवाशांच्या झोपेचे खोबरे करणाऱ्यांची आता खैर नाही. अशा बहाद्दरांना ताळ्यावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन कठोर नियम लागू केले आहेत. त्यानुसार कुणा प्रवाशाची झोपमोड झाल्याची तक्रार येताच प्रशासन बोगीमध्ये गोंगाट करणाऱ्यांना तत्काळ दंड व इतर कारवाईचा दणका देणार आहे.
आरामदायी व सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेला पसंती दिली जाते. पण प्रत्यक्षात काही उपद्रवी प्रवासी रात्रीच्या प्रवासातही मोबाईलवर मोठय़ाने गाणी ऐकतात. ग्रुपने प्रवास करणाऱ्यांच्या गप्पा रंगतात. यामुळे बोगीतील इतर प्रवाशांना नीट झोप घेता येत नाही. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने नियम कडक केले आहेत. त्यानुसार रात्री 10 नंतरच्या रेल्वे प्रवासात प्रशासनाचा जागता पहारा असणार आहे.
नवे नियम तत्काळ लागू केले असून नियम मोडल्याची तक्रार आल्यास लगेच कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांबरोबरच बोगीमध्ये गस्त घालणारे रेल्वेचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनाही शांततेत डय़ुटी करावी लागणार आहे. तसेच 60 वर्षांवरील प्रवासी, दिव्यांग, एकटी महिला यांना गरज लागल्यास रेल्वे कर्मचारी तत्काळ मदत करणार आहेत.
तक्रारीची वेळीच दखल घेणे बंधनकारक
नव्या नियमांनुसार, प्रवाशांच्या तक्रारींची वेळीच दखल घेण्याचे निर्देश रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. तक्रारदाराचे कारवाईवर समाधान न झाल्यास संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना वरिष्ठ प्रशासनाला उत्तर द्यावे लागणार आहे. आरामदायी प्रवासाच्या हेतूने नव्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे.
रात्री 10 नंतरचे नवे नियम
रेल्वे प्रवासात मोठय़ाने बोलण्यास, मोठय़ा आवाजाने गाणी ऐकण्यास बंदी
रेल्वेतील ‘नाईट लाइट’ वगळता इतर सर्व लाइट बंद कराव्या लागणार
ग्रुपने प्रवास करणाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू नये
रेल्वेच्या चेकिंग स्टाफ, आरपीएफ, इलेक्ट्रीशियन, कॅटरिंग व मेंटेनन्स स्टाफने शांततेने काम करणे



























































