
कोरोनाचा विषाणू नेमका कोणत्या पद्धतीने काम करतो याचे रहस्य हिंदुस्थानातील संशोधकांना उलगडले आहे. कोविड विषाणूमधील महत्त्वाच्या प्रोटिन्सची रचना शोधून काढण्यात हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडीतील संशोधक यशस्वी झाले आहेत.
त्यामुळे हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर कशाप्रकारे कृती करतो, त्याचा संसर्ग कसा पसरतो आणि त्याची तीव्रता किती आहे हे आता सहज समजणार आहे आणि त्या बळावर औषध निर्मिती सुलभ होणार आहे. आयआयटी मंडीतील शास्त्रज्ञांचा हा संशोधन अहवाल ‘करन्ट रिसर्च इन व्हायरोलॉजिकल सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. आयआयटी मंडीमधील स्कूल ऑफ बेसिक सायन्सेसचे सहाय्यक प्राध्यापक रजनीश गिरी यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन केले.
























































