
2023 च्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानला कांस्य पदक मिळवून देणारा शॉटगन नेमबाज अंगद बाजवाने कॅनडाची नागरिकता स्वीकारली आहे. त्यामुळे आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो कॅनडाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. या निर्णयाची माहिती अंगदने सोशल मीडियावरून दिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केलेल्या अंगदला हिंदुस्थानी राष्ट्रीय रायफल संघाकडून (एनआरएआय) ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता तो भविष्यात कोणत्याही अडथळय़ाविना कॅनडासाठी स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार आहे.
नागरिकत्व बदलण्यामागचे ठोस कारण अंगदने स्पष्ट केलेले नाही, मात्र मीडिया अहवालांनुसार त्याचे संपूर्ण कुटुंब कॅनडात वास्तव्यास आहे. एनआरएआयचे सचिव जनरल पवन सिंह यांनी सांगितले की, देशात निवडीचे स्वातंत्र्य असल्याने संघटनेने एनओसी दिली. हा निर्णय हिंदुस्थानसाठी तोटय़ाचा असला तरी त्याची भरपाई करण्याइतके टॅलेंट देशात उपलब्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































