हिंदुस्थानातील पहिले फिरते पोटविकार तपासणी केंद्र महाराष्ट्रात

377

राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी हिंदुस्थानातील पहिल्या फिरत्या पोटविकार केंद्राचे (एंडोस्कोपी ऑन व्हिल्स) मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या फिरत्या व्हॅनमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना पोटाच्या विकारावर संपूर्णपणे मोफत उपचार मिळतील.

महाराष्ट्र सरकार व बलदोटा इन्स्टिटय़ूट ऑफ डायजेस्टीव्ह सायन्सच्या संयुक्त विद्यमाने ‘एंडोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजेच फिरते पोटविकार केंद्र सुरू केले आहे. ही सुविधा चालू करण्यासाठी नरेंद्रकुमार बलदोटा व परिवार यांनी देणगी देऊन पुढाकार घेतला आहे.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आदी उपस्थित होते.

समाजाचे देणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पद्मश्री’ डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘एंडोस्कोपी ऑन व्हिल्स’ केंद्र हे देशातील पहिले केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. समाजाचे आपण देणे लागतो. त्यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने सुरू झालेली ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

सुसज्ज ऑपरेशन थिएटर
या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे. या गाडीत उपस्थित असणारे दोन तज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचे लवकर निदान, आतडय़ांचे अल्सर, बायोप्सी, आतडय़ांना सूज आली असेल तर त्याचे निदान या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या