
एकीकडे हिंदुस्थानचे पुरुष बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करत असताना आता हिंदुस्थानच्या दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पी या दोघींनीही जग जिंकले. उपांत्य लढतीत कोनेरू हम्पीने टायब्रेक लढतीत चीनच्या लेई टिंगजेला पराभवाचा धक्का देत महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि बुद्धिबळाच्या पटावर हिंदुस्थानचे विश्वविजेतेपद एक दिवस आधीच निश्चित केले. शनिवारी होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या लढतीत दिव्या आणि कोनेरू एकमेकांशी भिडतील आणि बुद्धिबळ विश्वावर तिरंग्याची छाप पाडतील. दिव्याप्रमाणे हम्पीसुद्धा फिडे कॅण्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीपूर्वीच विजेता देश निश्चित झाला आहे आणि तो देश म्हणजे हिंदुस्थान! कारण अंतिम फेरीत आमनेसामने आहेत हिंदुस्थानच्या दोन दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी आणि 19 वर्षीय दिव्या देशमुख.
आजच्या उपांत्य फेरीतील सामन्यात कोनेरू हम्पीने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळ करताना चीनच्या जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या लेई टिंगजे हिला टायब्रेकमध्ये 4-2 ने पराभूत केले आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दोघींमध्ये बुधवारी झालेले दोन्ही डाव बरोबरीत सुटले होते. हम्पीने उत्पृष्ट बचाव केला पण लेईला संधी असूनही हम्पीच्या बचावाचा भेद करणे शक्य झाले नाही आणि सामना 1-1 असा बरोबरीत संपला.
त्यानंतर दुसऱ्या टायब्रेक लढतीत पहिल्या डावात हम्पीने चूक करत सामना गमावला आणि स्कोअर 2-1 लेईच्या बाजूने झाला. मात्र दुसऱ्या डावात हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना जोरदार पुनरागमन केले आणि सामना जिंकत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर अखेरच्या टायब्रेक लढतीत हम्पीने उत्पृष्ट काwशल्य दाखवत पांढऱ्या व काळय़ा मोहऱ्यांनिशी झालेले दोन्ही डाव जिंकले आणि एपूण 4-2 अशा विजयासह अंतिम फेरीत धडक मारली.
हम्पीनेसुद्धा इतिहास रचला
कोनेरू हम्पी आता 2026 साली होणाऱ्या फिडे पॅण्डिडेट स्पर्धेत पात्र ठरणारी हिंदुस्थानची दुसरी आणि एपूण चौथी खेळाडू बनली आहे.याआधी चीनचा जू जिनर, रशियाची अलेक्झांद्रा गोरयाचकिना आणि हिंदुस्थानची दिव्या देशमुख या तिघी पात्र ठरल्या होत्या.