
हिंदुस्थानच्या गतविजेत्या महिला कबड्डी संघाने जगज्जेत्यांना साजेशी विजयी सलामी देताना दुबळ्या थायलंडचा 65-20 असा धुव्वा उडवत दुसऱ्या महिला वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धेत ‘हायफाय’ विजय मिळविला. तसेच इराण आणि यजमान बांगलादेशनेही विजयी सुरुवात केली.
सोमवारपासून सुरू झालेल्या स्पर्धेत बांगलादेशने युगांडाचा 42-22 असा फडशा पाडला. तसेच त्यांनी जर्मनीचीही 47-27 अशी धुळधाण उडवली. तसेच इराणने केनियाचा 42-10 असा फडशा पाडला. उद्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी हिंदुस्थान-बांगलादेश लढतीसह अन्य चारही सामने खेळविले जाणार आहेत. ‘अ’ गटातून हिंदुस्थान, यजमान बांगलादेश तर ‘ब’ गटातून इराण आणि नेपाळ किंवा तैपेई हे पात्र ठरणार, हे निश्चित आहे. त्यामुळे अंतिम सामनाही नेहमीप्रमाणे हिंदुस्थान आणि इराण यांच्यातच रंगणार, हे सांगायची कुणालाही गरज भासणार नाही.
तब्बल 13 वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी महिलांनी इराणचा पराभव करत जगज्जेतेपद संपादले होते. या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. बिहारच्या राजगीर येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील तीन-चार संघ वगळता सर्व संघ नवखे होते. कुणालाही फारशी कबड्डी खेळता येत नव्हती. 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा कबड्डी वर्ल्ड कप आयोजित केला जातोय खरा, पण यातही सहभागी देशांची नावे पाहून अपेक्षाभंग झालाय. सारे संघ धरून पकडून तर आणले नाहीत, असा प्रश्न मनी पडू लागलाय. कबड्डीची ऑलिम्पिकवारी करण्याचे स्वप्न बाळगणाऱया या खेळात यंदा गेल्या वर्षीचे केवळ सहा संघच खेळत आहेत.
सर्वात धक्कादायक म्हणजे हिंदुस्थान, बांगलादेश, इराण, चिनी तैपेई, थायलंड आणि नेपाळ हे सहा आशियाई संघच पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. बाकी त्यातही संघांची नावे काहीशी वेगळी. गेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या संघापैकी सहा संघच पुन्हा खेळत आहेत. हे पाहून कबड्डीची घसरण झालीय, हे कुणीही सांगू शकतो. 2012 ला खेळलेले कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई, मलेशिया, इटली, तुर्कमेनिस्तान हे संघ यंदा गायब झाले आहेत. याचाच अर्थ कबड्डीची फार मोठी घसरण झालीय.
ऑलिम्पिकचे स्वप्न पाहणारा हा खेळ फार मागे पडलाय. गेल्या दहा वर्षांत आशिया खंडाबाहेर कबड्डीच्या फारशा स्पर्धाच न झाल्यामुळे गेल्या वेळच्या आशिया खंडाबाहेरील एकाही संघाला वर्ल्ड कपमध्ये रसच उरला नव्हता. त्यामुळे महिला कबड्डीचे संघ गोळाच करता आले नाहीत. त्यामुळे झांजीबार, युगांडा, केनिया, जर्मनी आणि पोलंड बांगलादेश या संघांना झटपट स्थान मिळवता आले. त्यातच यंदाच्या सहभागी झालेल्या संघांचा दर्जा अत्यंत सुमार असल्यामुळे यंदाही अंतिम सामना हिंदुस्थान आणि इराणमध्येच खेळवला जाणार, हे आताच स्पष्ट दिसतेय.
यंदाच्या वर्ल्ड कपमधील 11 पैकी 6 संघ आशियाई आहेत, 3 आफ्रिकन आणि दोन युरोपियन. त्यामुळे ही स्पर्धा वर्ल्ड कप नव्हे तर आशिया कपच असल्याचे जाणवतेय. 13 वर्षे लटकलेल्या स्पर्धेचे आयोजन आधी पाटण्यातच होणार होते. नंतर ते हैदराबादकडे वळवण्यात आले. अखेर ही स्पर्धा मिरपूरला घेण्याच ठरले आणि आता ती स्पर्धा उरकण्याचा प्रयत्न केला जात आहे.





























































