गुकेशची दुसऱ्या स्थानावर मुसंडी, कार्लसननंतर अर्जुन एरिगॅसीला हरविले

हिंदुस्थानच्या जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. त्याने सातव्या फेरीत आपलाच देशसहकारी अर्जुन एरिगॅसीला हरविले. 19 वर्षीय गुकेशचा क्लासिकल बुद्धिबळमध्ये अर्जुनवरील हा पहिलाच विजय होय.

दोम्माराजू गुकेशचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. त्याने आधीच्या फेरीत अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनचा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. गुकेश आता 11.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. अमेरिकेचा फॅबियानो कारूआना 12.5 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याने सातव्या फेरीत चीनच्या वेई यी याचा पराभव केला. गुकेशविरुद्धच्या पराभवानंतर अर्जुन एरिगॅसी 7.5 गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला, तर वेई 6.5 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कार्लसन 11 गुणांसह तिसऱ्या, तर द्वितीय मानांकित हिकारू नाकामुरा 8.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. स्पर्धेत अजून तीन फेऱ्या शिल्लक असून गुकेशने आता विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.

महिला गटात युक्रेनच्या अन्ना मुजीचुकने आर्मागेडन टायब्रेकमध्ये दोन वेळची वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पीचा पराभव केला, तर दुसरीकडे हिंदुस्थानच्या आर. वैशाली हिला चीनच्या लेई टिंगजी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.