
इंडोनेशिया येथील बटाम येथे उद्यापासून आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा 65 जणांचा चमू सज्ज झालाय. आशियातील अव्वल शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या मानाच्या स्पर्धेतील विजेत्यांचा फैसला 3 ऑक्टोबरला होईल.
हिंदुस्थानी संघामध्ये बॉबी सिंग, सर्बो सिंग, जयप्रकाश वैभव महाजन, राम मूर्ती, चैत्रेसन नतेशन, टी कॅण्डी रियाझ या खेळाडूंचा समावेश आहे. महाराष्ट्राकडून रोहित शेट्टी व रोहन धुरी या स्टार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अमला ब्रह्मचारी, माधवी बिलोचन यांच्या खांद्यावर हिंदुस्थानची मदार असेल. तसेच महिला फिजिक स्पोर्टस् प्रकारात निसरीन पारीख, मंजिरी भावसार, अदिती बंब, केतकी, इरा मूर, निशा मोयर या महिला सहभागी होणार आहेत. प्रेमचंद डेग्रा, चेतन पाठारे व प्रशांत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी संघ चॅम्पियनशिपमध्ये उतरणार आहे.
दिव्यांग स्पर्धेचेही आयोजन
या वर्षी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत दिव्यांग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंजाबकडून शामसिंग शेरा, छत्तीसगढमधून अश्वनकुमार, दिल्लीतून लोकेशकुमार, तामीळनाडूतून के. सुरेश हे हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील.
गतविजेता सुनीत जाधव खेळणार नाही
‘महाराष्ट्र श्री’, जागतिक स्पर्धा यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱया मराठमोळ्या सुनीत जाधव याने आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेतून माघार घेतली आहे. तो या स्पर्धेचा गतविजेता आहे. यावर त्याच्याशी संपर्क साधला असता तो म्हणाला, मी काही काळ यामधून ‘ब्रेक’ घेतलाय, पण कोरिया येथे होणाऱया जागतिक स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न करीन.




























































