
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून उद्या गुन्हा दाखल करण्यात येणार असून, संबंधित आरोपीची खातरजमा करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, असे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या जबाबानुसार, काल रात्री बाराच्या सुमारास त्यांना फोन आला. संबंधिताने प्रशांत कोरटकर असे स्वतःचे नाव सांगत तुम्ही जो संदर्भ छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल देत आहात त्यामध्ये ब्राह्मणांबद्दल वक्तव्य करू नये, असे सांगत घरात घुसून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्य करून, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ केली. हा फोन नागपूरमधून आल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, धमकीचा आरोप प्रशांत कोरटकरांनी फेटाळला आहे. तो माझा आवाज नसून माझा आवाज मॉर्फ केल्याचा दावा कोरटकरांनी केला आहे.