
शीना बोरा हत्याकांडात आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहात आहे. शीना बोरा हत्याकांडानंतरही अनेक वेळा ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली होती. कधी मंजुळा शेट्ये प्रकरणात महिला कैद्यांना भडकवल्यामुळे तर कधी तिच्या स्वतःच्या घटस्फोटावरून ती कारागृहात असतानाही प्रकाशझोतात होती. पण आता मात्र ती एका वेगळ्याच कारणावरून पुन्हा चर्चेत आली आहे.
ही चर्चा आहे, कारागृहातल्या तिच्या कोठडीत साचवून ठेवलेल्या 400 लीटर पाण्याची. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, इंद्राणीच्या कोठडीत पाण्याचे काठोकाठ भरलेले प्रत्येकी 20 लीटरचे 20 कंटेनर तिने जमा करून करून ठेवले आहेत. तिच्या कोठडीच्या भिंतीच्या लगत तिने ते रचून ठेवले आहेत. एका माणसासाठी पाण्याचा इतका साठा खूप असल्याने तिला कारागृहातील अधिकाऱ्यांनी याचं कारण विचारलं. त्यावर तिने फक्त तिला त्या पाण्याची गरज आहे, इतकंच उत्तर दिलं आहे.
इंद्राणीला महिन्याच्या खर्चासाठी दरमहा 4 हजार रुपये मिळतात. त्यातून ती 120 रुपये प्रति 20 लीटरचे पाण्याचे कंटेनर, जेवण आणि सौंदर्य प्रसाधनं खरेदी करते. इंद्राणी आपली कोठडी कोणत्याही अन्य महिला कैद्यासोबत शेअर करत नाही. तिचं इतर वेळचं वागणं सामान्य असलं तरी तिचं हे पाण्याचे कंटेनर का जमा करते, याचं कोडं तुरुंग प्रशासनालाही पडलं आहे. इंद्राणीचं असं वागणं अजब असलं तरी त्याने इतर कैद्यांना जिवाचा धोका नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.




























































