नाणार प्रकल्प कागदावरच राहणार; प्रत्यक्षात होणार नाहीच!

54

सामना प्रतिनिधी । पुणे

‘कोकणातील नाणार प्रकल्पासंदर्भात दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मात्र, हे करार दिल्लीमध्ये झाले असून, परस्पर करण्यात आले आहेत. नाणार प्रकल्प महाराष्ट्रात करायचा आहे, तर महाराष्ट्र शासन, उद्योग विभागाला सोबत घेणे अपेक्षित आहे. मात्र, आम्हाला कोणतीही कल्पना न देता, विश्वासात न घेता हे करार करण्यात आले आहेत. त्यातच स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प कागदावरच राहणार आहे. प्रत्यक्षात होणार नाहीच,’ असे स्पष्ट मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे आयोजित ‘नवीन उद्योग धोरण चर्चासत्रा’नंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्योगमंत्री देसाई म्हणाले, नाणार प्रकल्पासंदर्भात गेल्या महिन्यात सौदी अरेबियाच्या एका कंपनीबरोबर करार केला गेला, तर दोन दिवसांपूर्वी अबूधाबीच्या कंपनीबरोबर करार झाला. हे दोन्ही करार दिल्लीमध्ये परस्पर झाले. त्या संदर्भात आम्हाला कोणतीही कल्पना दिलेली नाही. जर उद्योग महाराष्ट्रात येणार असले, तर महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला, राज्य शासनाला बरोबर घेणे अपेक्षित होते. तसे न करता, परस्पर करार केले गेले. याचा अर्थ तो करार कागदावरच राहणार आहे. कारण तेथे उद्योग रिफायनरी होणे शक्य नाही, अशी परिस्थिती आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध आहे, हे समजताच मी स्वत: कोकणात गेलो होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. तेथील दहाच्या दहा ग्रामपंचायतींनी प्रकल्प नको, असे ठराव केले आहेत. तसेच जमीन मोजणीलाही स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळेच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्रीही अनभिज्ञ
‘नाणार प्रकल्पाच्या करारासंदर्भात माझ्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनाही काही माहिती नाही. त्यांनाही करार करताना बोलाविले नव्हते. याबाबत तेही अनभिज्ञच होते. त्यामुळे केंद्राला फक्त करार करण्यापुरताच रस असेल, असे वाटते,’ असेही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

तमिळनाडूसारखी परिस्थिती उद्भवू नये
‘काही वर्षांपूर्वी तमिळनाडूमधील तुतिकोरेन या गावात स्टरलाइटचा एक उद्योग येणार होता. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तेथील जनतेने तीव्र आंदोलन केले. आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात १४ लोक ठार झाले. त्यानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्टरलाइटचा उद्योग रद्द करीत असल्याची घोषणा केली. मात्र, या सर्व प्रकारात १४ माणसांना आपले प्राण गमवावे लागले. असा अनिष्ट प्रकार आपल्या राज्यात घडायला नको, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले. त्यावर ‘जनतेला प्रकल्प नको असेल, तर मी लादणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची आठवण देसाई यांनी सांगितली.

आपली प्रतिक्रिया द्या