
टीम इंडियाचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 27 नोव्हेंबर पासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वीच टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. विस्फोटक फलंदाज ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा Ishant Sharma) पहिल्या दोन कसोटीतून बाहेर झाले आहेत. ‘क्रीकइन्फो’ने याबाबत वृत्त दिले आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप यास दुजोरा दिलेला नाही.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एक दिवसीय सामने, 3 टी-20 सामने आणि 4 कसोटी सामने खेळायचे आहेत. 27 नोव्हेंबरला पहिला एक दिवसीय तर 17 डिसेंबरला कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. एडिलेड येथे पहिला दिवस-रात्र कसोटी सामना रंगणार आहे.
…तर तिसऱ्या कसोटीत संधी
आयपीएल दरम्यान रोहित आणि इशांत शर्माला दुखापत झाली होती. इशांत शर्मा पहिल्या दोन कसोटीतून बाहेर झाला असला तरी आता 7 जानेवारी, 2021 ला होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळू शकतो. त्यासाठी त्याला लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला पोहोचावे लागेल.
तर दुसरीकडे रोहित शर्मा अद्याप दुखापतीतून पूर्ण सावरलेला नाही असे वृत्त आहे. अजूनही तो हॅमस्ट्रिंगच्या दुखण्याने पीडित असून उपचार घेत आहे. त्यामुळे तो आपला फिटनेस सिद्ध करू शकलेला नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यावर खेळाडूंना 14 दिवस सक्तीने क्वारंटाईन रहावे लागत आहे. त्यामुळे रोहित फिट झाला तरी त्याला 8 डिसेंबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावे लागेल आणि दोन आठवडे क्वारंटाईन राहून तो पुढील लढतीत भाग घेऊ शकतो.
टीम इंडियाला धक्का
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पितृत्वाची रजा टाकली असून पहिली कसोटी झाल्यावर हो मायदेशी येईल. अशात आता रोहित आणि इशांत हे देखील पहिल्या दोन कसोटीसाठी उपलब्ध नसतील, त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.