क्लस्टरच्या नावाखाली धोकादायक इमारतींचा आकडा फुगवण्याचा घाट; ठाण्यात बिल्डरांच्या फायद्यासाठी अदृश्य हातांची खेळी

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात यंदा 88 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या आता तब्बल साडेचार हजार झाली आहे. मात्र बिल्डरांच्या फायद्यासाठीच हा आकडा फुगवण्याचा घाट घातला जात आहे का? असा संशय जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांनी व्यक्त केला आहे. पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही अदृश्य हात ही खेळी करीत असल्याचा आरोपही होत असल्याने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षणच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची यादी ठाणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते. अशीच यादी दोन महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका प्रशासनाने जाहीर केली होती. यानुसार संपूर्ण शहरात 4 हजार 297 इमारती धोकादायक असून त्यामध्ये 86 इमारती अतिधोकादायक आहेत. त्यापैकी 25 इमारती पालिकेने यापूर्वीच रिकाम्या केल्या आहेत. त्यानंतर करण्यात आलेल्या सर्व्हेत वाढ होऊन हा आकडा 4407 वर गेला होता, परंतु आता पुन्हा केलेल्या सर्व्हेत हा आकडा ४४९५ एवढा झाला आहे. याचाच अर्थ धोकादायक इमारतींची संख्या ही वाढवली जात आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

काही इमारतींच्या अहवालामध्ये गौडबंगाल
विशेष म्हणजे काही ठिकाणी एकाच इमारतींचे दोनदा संरचनात्मक परीक्षण करण्यात आले असून त्यामध्ये एक अहवाल अतिधोकादायक तर दुसरा अहवाल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यावरून वादाची ठिणगी पडल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अहवालात त्रुटी असलेल्या इमारतींचे दोन्ही संरचनात्मक परीक्षक आणि पालिकेने नियुक्त केलेले त्रयस्थ परीक्षक यांनी संयुक्तपणे अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी दिले आहेत.

धोकादायक जाहीर केलेल्या इमारती 2016 ते 2025 या काळातील आहेत. त्यात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे, परंतु अहवालात कोणाला काही शंका असेल तर त्यांनी स्वतः ऑडिट करून अहवाल सादर करावा. तसेच व्हीजेटीआयकडून प्रमाणपत्र आणावे.
शंकर पाटोळे, पालिका अधिकारी