मंदीचा तडाखा कायम, औद्योगिक उत्पादन 4.3 टक्क्यांनी घट

251

उत्पादन क्षेत्राच्या मानगुटीवर बसलेले मंदीचे भूत काही केल्या उतरायचे नाव घेत नसल्याचेच दिसते. मंदीच्या तडाख्यामुळे यंदा सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधील उत्पादनाच्या तुलनेत 4.3 टक्क्यांनी घटले आहे. अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबाबत विविध संस्था व रेटिंग एजन्सींकडून चिंता व्यक्त केली जात असतानाच ही आकडेवारी पुढे आली आहे.

सप्टेंबरमध्ये उत्पादन क्षेत्र 3.9 टक्क्यांनी ढेपाळले. गेल्या वर्षी या क्षेत्रातील उत्पादनात 4.8 टक्क्यांची वाढ झाली होती. याबरोबरच इतर क्षेत्रांसाठीही सप्टेंबर महिना निराशादायी ठरला. ऊर्जा क्षेत्रातील उत्पादनात 2.6 टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षी हे क्षेत्र 8.2 टक्क्यांच्या उसळीने झळाळले होते. मायनिंग क्षेत्रातही उदासीन चित्र राहिले. सप्टेंबरमध्ये या क्षेत्रातील उत्पादन 8.5 टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

2012 नंतर पहिल्यांदा एवढी मोठी घसरण
देशाच्या औद्योगिक, ऊर्जा आणि मायनिंग अशा प्रमुख क्षेत्रांतील उत्पादनात 2012 नंतर पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे, असे ‘फिच’ या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीचे वरिष्ठ संचालक देवेंद्र कुमार पंत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या