
सामना ऑनलाईन,मुंबई
येत्या 31 ऑक्टोबर रोजी सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे, पण तो जाहीर करण्याआधीच महाराष्ट्राला महागाईने गाठले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे राज्यभरात भाजीपाल्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून भाज्या प्रचंड कडाडल्या आहेत. सरकारच्या जलयुक्त शिवार या योजनेमुळे यंदा शेतकऱयांना चांगले दिवस येतील असे बोलले जात होते; परंतु पावसाने ओढ दिल्याने विदर्भ, मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघाला असून मुळात उत्पादनच कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवकच कमी झाली आहे. आता महागाईच्या भस्मासुराने डोके वर काढले असून सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मुंबईतल्या भाजीबाजारांमध्ये आज भाज्या तब्बल 15 ते 20 रुपयांनी कडाडल्याचे दिसले. कारल्यापासून ते मेथीच्या जुडीपर्यंत सगळय़ाच भाज्या महाग झाल्या आहेत. ज्या ठिकाणी ग्राहक मेथीच्या दोन जुडय़ा खरेदी करत होते त्या ठिकाणी आता केवळ एकच जुडी घेऊन जात असल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.

अनेक ग्राहक तर केवळ पावकिलोच भाजी विकत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तर पेट्रोल- डिझेलचे दर तर कडाडले आहेतच, पण आता भाजीपालाही महाग झालाय. त्यामुळे आता हवा खाऊन आणि पाणी पिऊन जगायचे का, असा सवाल अनेकांनी केला.
‘ब्रेक थ्रू’ हंगामाचा परिणाम
भाजीपाल्याच्या उत्पादनावर ‘ब्रेक थ्रू’ हंगामाचाही परिणाम झाला आहे. ब्रेक थ्रू हंगाम म्हणजेच जून ते सप्टेंबरदरम्यानचा खरीप हंगाम संपत आला आहे. आता रब्बी पिकांचा हंगाम सुरू होणार आहे, परंतु सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा राज्यभरातील कृषी उत्पन्न समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचे राज्याच्या कृषी विभागाचे माजी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.
रब्बी पिकांसमोरही आव्हान
मुळात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे नद्या, कालव्यांमध्ये तसेच विहिरींमध्ये पाणी नाही. परिणामी, आता रब्बी पिकांसाठी पाणी कुठून आणायचे हा यक्षप्रश्न शेतकऱयांसमोर आहे. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचाही पाणी नसल्याने बोजवरा उडालेला आहे. धरणांमध्ये असलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे आता महागाईचा हा भस्मासुर यापुढेही पाठ सोडणार नसल्याचे उघड झाले आहे.
पुन्हा दुष्काळ जाहीर करण्याची नामुष्की
राज्य सरकारने यंदाच्या एप्रिलमध्ये राज्यातील आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता. मराठवाडय़ातील संभाजीनगर, जालना, धाराशीव, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिह्यातील तालुके, धुळे, नंदुरबार, विदर्भात अकोला, बुलढाणा या तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला. आता मान्सून संपल्यानंतरही ही परिस्थिती बदलेली नाही. सरकारवर पुन्हा एकदा दुष्काळ जाहीर करण्याची नामुष्की ओढवली. खतांच्या दरवाढीचाही शेती उत्पादनावर विपरीत परिणाम
मुकाबल्यासाठी सरकार सज्ज -मुख्यमंत्री
केवळ 56 टक्केच पाऊस झाल्याने जिल्हय़ातील परिस्थिती भीषण आहे. पीक उत्पादनात यामुळे मोठी घट होणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. संभाव्य दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने तयारी केली असून सर्व उपाययोजना वेळेच्या आधी सुरू केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ड्रोनचाही वापर
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. दुष्काळी भागाची ड्रोनच्या सहाय्याने छायाचित्रे काढण्यात येतील. कोणत्या भागात पिकांची स्थिती कशी आहे, पाण्याचे स्रोत, जलसाठा याचाही ड्रोनच्या मदतीने आढावा घेतला जाईल. त्यानंतर पिकांची आणेवारी काढतानाही त्याचा फायदा होईल.
भाज्यांची आवक कमी, उष्णतेचा कहर
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटममध्ये भाजीपाल्याची आवकच घटली असून 600 गाडय़ा रोज येत होत्या पण आता 400 ते 450 गाडय़ा येत असल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले. कडक उन्हामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे.





























































