महागाईचे चटके, नॉनव्हेज थाळी महागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र आणि राज्य सरकारला महागाई कमी करण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे महागाईचे चटके सर्वसामान्यांना अधिक प्रमाणात बसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात देशात नॉनव्हेज थाळी 6 टक्क्यांनी महागली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये फेब्रुवारीमध्ये 54 रुपयांना मिळणारी मांसाहाराची थाळी 2025 च्या फेब्रुवारीमध्ये 57.4 रुपयांपर्यंत महाग झाली आहे.

क्रिसिलने ‘आरआरआरः राईस रोटी रेट’चा अहवाल जारी केला असून यात ही माहिती दिली आहे. एकीकडे मांसाहाराची थाळी महागली असताना व्हेज थाळी मात्र स्वस्त झाल्याचे म्हटले आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत 5 टक्के घट झाली आहे. जानेवारीमध्ये व्हेज थाळीची किंमत 28.7 रुपये होती. ती आता 26.5 रुपये अशी झाली आहे. व्हेज थाळीमध्ये रोटी, भाज्या (कांदा, टोमॅटो आणि बटाटा), भात, डाळ, दही आणि सॅलड यांचा समावेश होतो. मांसाहारी थाळीमध्ये डाळीऐवजी चिकनचा समावेश करण्यात आला आहे.

टोमॅटो स्वस्त झाल्याचा फायदा

क्रिसिलच्या अहवालानुसार, टोमॅटो आणि एलपीजीच्या किमती कमी झाल्यामुळे व्हेज थाळीची किंमत कमी झाली आहे. टोमॅटोच्या किमती वार्षिक आधारावर 28 टक्के कमी झाल्या आहेत, तर एलपीजी सिलिंडर 11 टक्के स्वस्त झाला आहे. कांदे आणि बटाटय़ाच्या किमतीतसुद्धा घसरण झाल्याने याचा फायदा व्हेज थाळीला मिळाला.

चिकनच्या किमती वाढल्या

मांसाहारी थाळींच्या किमतीत वाढ होण्यामागे ब्रॉयलर चिकनच्या किमतीत वाढ होणे हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे. ब्रॉयलर चिकनच्या किमतीत 15 टक्के वाढ झाली आहे. मांसाहारी थाळीच्या किमती वाढण्यास ब्रॉयलर चिकनचा वाटा हा 50 टक्के असतो, असेही या अहवालात म्हटले आहे.