महागाईचा आगडोंब ! सर्वसामान्यांनी जगायचे कसे? वाचा… काय झालं महाग?

15

सामना प्रतिनिधी । मुंबई

एकीकडे सरकार महागाईचा दर कमी झाल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे कडधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत सगळे चांगलेच कडाडले आहे. महागाईचा अक्षरश: आगडोंब उसळला असून सरकारने नुसतीच घोषणाबाजी आणि वचने देऊन सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गहू, तांदूळ, साखर, कडधान्ये, भाजी अशा जीवनावश्यक वस्तुंच्या दरात 15 ते 20 रुपयांची वाढ झाल्याने महीन्याचे बजट कोलमडले असून शिजवायचे काय आणि खायचे काय ? असा सवाल सरकारला विचारला जात आहे.

गेल्या दीड ते दोन महिन्यांत सर्वकाही महागले

चांगल्या दर्जाचा तांदूळ 50 रुपये तर कमी प्रतीचा तांदूळ 30 रुपयांना मिळत होता. या तांदळाची किंमत आता 40 ते 65 रुपयांपर्यंत गेली आहे. तर गव्हाच्या दरातही 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे.  मैद्याच्या किमतीतही वाढ झाल्याने ब्रेडच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. मैद्याच्या पीठाच्या 50 किलोच्या पिशवीची किंमत 1 हजार 150 रुपयांवरून 1 हजार 300 रुपयांपर्यंत झाली आहे. भाज्या आणि फळभाज्यांच्या किमतीतही 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेडही महागला

ब्रेड तयार कंपन्यांनी ब्रेडच्या किमतीत तीन ते चार रुपयांची वाढ केली आहे. ब्रिटानीया, मॉर्डन वीब्स या कंपन्यांनी ब्रेडचे दर वाढवले आहेत. 400 ग्रॅम (लहान वडी) ब्रेडची किंमत 22 वरून 25 रुपये तर 800 ग्रॅमच्या पुडय़ाची किंमत 44 वरून 48 रुपये झाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत स्थानिक बेकरीमालकही ब्रेडच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

वाहतुकीचे दर वाढले, शेतमालाचे नुकसान

एकीकडे वाहतुकीचे दर वाढले असून पावसाच्या लहरीपणामुळे शेतमालाचेही चांगलेच नुकसान झाले. त्याचा परिणामही महागाई वाढण्यावर झाला असण्याची शक्यता असल्याचे परळच्या हुले मंडईतील श्री सिद्धिविनायक मसाला स्टोअर्सचे मालक अशोक सुर्वे यांनी सांगितले. पाच रुपयांसाठी ग्राहक खुप भांडते. महागाईच्या तुलनेत पगार नाहीत. त्यामुळे कुणालाच सध्याचे दर परवडत नसल्याचे भाजीच्या दुकानाचे मालक रवींद्र कुमार यांनी सांगितले.

table01

आपली प्रतिक्रिया द्या