देवगडमध्ये जखमी अवस्थेत आढळले कासव, उपचारानंतर समुद्रात सोडणार

327

देवगड तालुक्यात रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास देवगड जामसंडे नगरपंचायतीचे कर्मचारी सचिन राऊळ व नगरपंचायतीचे जीवरक्षक हार्दिक कुबल यांना देवगड पवनचक्की येथील बीचवर जखमी अवस्थेत जाळ्यात अडकलेले ऑलिव्ह रिडले समुद्री कासव सापडले. कासव साधारण पावणे दोन फुट लांब व सव्वा फुट रुंदीचे आहे. सदर कासव जखमी अवस्थेत असून या कासवावर देवगड येथील पशुवैद्यकीय डॉ. ढेकणे यांनी प्राथमिक उपचार केले असून सदर कासव तारामुंबरी येथील अक्षय खवळे, गोविंद खवळे, पंकज दुधवडकर, दिपक खवळे, ज्ञानेश्वर सारंग, हितेश खवळे, तन्मय जगताप या निसर्ग प्रेमी युवकांच्या सहकार्याने तारामुंबरी येथील भैरवनाथ बचतगटाच्या तारामुंबरी येथील महिलांच्या ताब्यातील शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्पात त्याला हलविण्यात आले आहे व या कासवाच्या जखमेवर पुर्णतः उपचार करुन मगच त्याला समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे तारामुंबरी येथील कांदळवन संवर्धनाचे काम करणारे ग्रामस्थ लक्ष्मण तारी यांनी सांगितले आहे.

याबाबतची संपुर्ण माहिती त्यांनी मालवण येथील कांदळवन कक्षाचे  रोहित सावंत व वनरक्षक बडदे यांच्या मार्फत वनविभागाला देण्यात आली आहे. याबाबत मालवण वनक्षेत्रपाल श्री.सोनावणे साहेब व कणकवली वनक्षेत्रपाल सोनावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या