मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडीचा बळी, रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाल्याने महिलेचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या वाहतूककोंडीने आणखी एक बळी घेतला. अंगावर झाड कोसळलेल्या महिलेला मुंबईला घेऊन निघालेली रुग्णवाहिका महामार्गाच्या कोंडीत तब्बल चार तास अडकून पडली. त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहोचून उपचार न मिळाल्यामुळे या महिलेचा अखेर मृत्यू झाला. छाया पुरव असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे सरकार आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल करण्यात येत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चांगले रस्ते उखडून सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. हे कामच प्रवाशांच्या जीवावर उठले आहे. या महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत.

सफाळे येथील मधुकरनगरात राहणार्‍या छाया पुरव यांच्या अंगावर शनिवारी झाड कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात येत होते. परंतु मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणार्‍या लेनवर सकाळपासूनच प्रचंड ट्रॅफिककोंडी झाली होती. त्यामुळे छाया पुरव यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका तब्बल चार तास एकाच ठिकाणी अडकून पडली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. मुंबईला नेण्याऐवजी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णावाहिका तातडीने मीरा-भाईंदर येथील ऑर्बिट हॉस्पीटलमध्ये नेली. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. डॉक्टरांनी छाया यांना मृत घोषित केले.