पाईपलाईन तोडल्याचा जाब विचारणाऱया शेतकऱयांवरच गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील मौजे पारगाव सुद्रीक ते लोणी व्यंकनाथ या रस्त्यालगत एअरटेल कंपनीचे नेटवर्क केबल टाकण्याचे काम पाच जेसीबी यंत्राच्या साहाय्याने सुरू आहे. यासाठी संपूर्ण रस्त्याच्या साइडपट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, अनेक शेतकऱयांच्या पाईपलाईन तोडल्या आहेत. याबाबत टेलिसोनिक नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पारगाव सुद्रीक येथील चार शेतकऱयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदाराच्या या मुजोरपणाचा शेतकऱयांमधून तीक्र निषेध करण्यात येत आहे.

मौजे पारगाव सुद्रीक ते लोणी व्यंकनाथ या पाच किलोमीटर रस्त्याच्या कडेला जेसीबी यंत्राच्या साहाय्याने चर खोदून त्यामध्ये एअरटेल कंपनीचे नेटवर्क केबल टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम रस्ता व साईडपट्टय़ा सोडून गटाराच्या बाजूने करावयाचे होते; परंतु ठेकेदाराने साईडपट्टय़ा व रस्ता खोदून नेटवर्क केबल टाकण्याचे काम सुरू केले. यामध्ये अनेक शेतकऱयांच्या पाईपलाईन तुटून नुकसान झाले. याबाबत पारगाव सुद्रीक येथील शेतकऱयांनी टेलिसोनिक नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराला रस्ता तोडू नका, साईडपट्टय़ा उकरू नका, गटारातून चर काढून केबल टाकण्यास सांगितले. मात्र, टेलिसोनिक नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराने ‘मी कोण आहे, मी कोणाचा माणूस आहे, हे माहिती आहे का, माझे काम कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही कोणाकडेही जा’ असे सांगून या उलट पारगाव शेतकरी दत्तात्रय तुकाराम कुलांगे व इतर तीनजणांवर मारुती आप्पा शिंदे (रा. महाड सांगवी, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मौजे पारगाव सुद्रीक व लोणी व्यंकनाथ या गावांची पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन, अनेक शेतकऱयांच्या पाईपलाईन, भारत संचार निगमची केबल, अनेक वृक्षांची तोड केली. रस्ता व साईडपट्टय़ा असे प्रचंड नुकसान या ठेकेदाराने केले असून, याबाबतची तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धर्मनाथ आप्पासाहेब काकडे यांनी कार्यकारी अभियंता व तहसीलदारांकडे केली आहे. तसेच, नुकसानाची पाहणी करून भरपाई मिळावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.