दादा भुसेंना ड्रग्ज माफियांकडून खोके; सखोल चौकशी करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमधील शिंदे गाव एमआयडीसीमध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या कारखान्यातून पोलिसांनी 300 कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले होते. त्या कारखान्याला पालकमंत्री दादा भुसे यांचा आशीर्वाद असून त्यासाठी त्यांना ड्रग्ज माफियांकडून खोके मिळत होते, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. याप्रकरणी दादा भुसे यांनी सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

ललित पाटील आणि दादा भुसे यांच्यात कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनीही केला होता. सबळ पुरावे असल्याशिवाय ही मंडळी अशा स्वरूपाचा आरोप करणार नाहीत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची चौकशी करणार का? या ड्रग्जच्या पैशातून दादा भुसे यांना मोठी आर्थिक मदत मिळाली का? आतापर्यंत ललित पाटीलने दादा भुसे यांना किती खोके दिले? त्या बदल्यात दादा भुसे ड्रग्जच्या कारखान्याला संरक्षण पुरवत होते का? अशा प्रश्नांचा भडिमार संजय राऊत यांनी यावेळी सरकारवर केला.

भुसेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

ललित पाटील याला मिंधे गटातील एका मंत्र्याने ससून रुग्णालयातून पळून जायला मदत केली, असा आरोप आहे. अनेकांनी या प्रकरणात दादा भुसे यांचे नाव उघडपणे घेतले आहे. त्यामुळे भुसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

केंद्राकडे तक्रार करणार

राज्यातील एक मंत्री ड्रग्ज रॅकेटमध्ये काम करतोय ही गोष्ट गंभीर आहे, त्यामुळे याप्रकरणी आपण केंद्रीय तपास यंत्रणा, अमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्ष आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.