
‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचे दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना विमानतळ संचालकांना लेखी आदेशान्वये दिली आहे.
शिर्डी विमानतळावर जगभरातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात यावी. यासाठी कोपरगाव व राहाता पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, काकडी व कोऱ्हाळे येथील आरोग्य पथकांची विमानतळावर नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी प्रवाशांची नोंद ठेवावी, तपासणी करावी व याबाबतचा अहवाल रोज सायंकाळी 6 वाजेपर्यंत तहसीलदारांना सादर करण्याच्या सूचनाही या आदेशात दिल्या आहेत.
विमानतळावर थॅर्मल स्कॅनर, सॅनिटायझर व प्रवाशांना हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करावी. जंतुनाशकाने विमानतळ प्रवासी बैठक कक्ष व परिसरात फवारणी करण्याची दक्षता घ्यावी. कोरोना नवीन व्हेरियंट, कोरोना नियमावलीबाबत माहितीपत्रके, ध्वनिक्षेपकाद्वारे सार्वजनिक उद्घोषणा, बॅनर्स या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. शारीरिक अंतर, मास्कचा वापर व हात वारंवार स्वच्छ धुणे हे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय प्रवाशांना बंधनकारक करण्यात यावेत. विमानतळावर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.





























































