थट्टा-मस्करी केल्याने नातेसंबंध सुधारतात; संशोधनाचा निष्कर्ष

558

लग्न झाल्यानंतर गोडीगुलाबीने राहण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, नेहमी गोडीगुलाबीने राहण्यापेक्षा काही किरकोळ भांडणे, एकमेकांची थट्टा मस्करी करणे, जिव्हारी न लागणारे टोमणे अशा गोष्टी करण्याने जोडप्यांमधील प्रेम आणखी वाढते, असे एका संशोधनातून उघड झाले आहे. मात्र, विनाकारण एकमेकांचा पाणउतारा करणे, अपमान करणे यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो. मात्र, हलक्याफुलक्या स्वरुपात थट्टा मस्करी करण्याने नात्यात गोडवा निर्माण होतो, असे संशोधकांचे मत आहे. अमेरिकेच्या अॅप्लिचेन स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

एकमेकांना स्पेस देऊन समजून घेण्यानेही नातेसंबंध सुधारतात. त्यामुळे एकमेकांच्या कामातील उणीदुणी काढून चिडवण्यापेक्षा एखाद्या क्षणावरून घटनेवरून थट्टामस्करी करण्याने संबंधातील तणाव निवळतो. आपला जोडीदार एखादे गाणे गात असेल आणि त्याचे सूर-ताल चुकल्यास आपण योग्य स्वरात गाणे गायल्यास आपले हाव-भाव ओळखून समोरच्याला चूक समजते आणि त्यामुळे जवळीक वाढण्यास मदत होते. मात्र, समोरच्याची चूक दाखवण्यापेक्षा हावभावातील आपुलकीने नातेबंबंध सुधारतात, असे संशोधकांनी सांगितले. जोडीदाराला चिडवण्याचे आणि थट्टा मस्करी करण्याचे अनेक प्रकार आहेत. मात्र, हे सर्व ओढून ताणून न करता सहज आणि स्वाभाविक असले पाहिजे, असेही संशोधक आणि मनोविकारतज्ज्ञ क्रिस्टीन एल्विन यांनी सांगितले.

कोणत्याही नातेसंबंधात आपुलकी आणि गंभीरता असण्यापेक्षा जोडीदाराशी मजामस्करी करण्याने नातेसंबंध दृढ होतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की, दिवसभर जोडीदाराची मजा मस्करी करावी, मजा मस्करी करतानाही मर्यादा जपली पाहिजे, असे संशोधकांनी सांगितले. वेगवेगळ्या पद्धतीने जोडीदाराला न दुखावता थट्टा मस्करी, टोमणे मारता येतात. त्यासाठी एकमेकांवर हसण्यापेक्षा एकमेकांसोबत हसावे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी असेही क्रिस्टीन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या