बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 1 डिसेंबरपासून आयुर्विम्याच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता वाढेल तसेच गॅरंटीड रिटर्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. हप्ता वाढला तरी ग्राहकांना जास्त सुविधा मिळणार आहे.

इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऑथोरेटी ऑफ इंडिया नवे नियम लागू करणार आहे. यासंदर्भात आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी सांगितले की, हप्ता जरी वाढला तरी ग्राहकांना जास्त सुविधा मिळतील. फिनसेफ इंडियाच्या मृण अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार, पेन्शन प्लॅनला ग्राहकाभिमुख बनवले जाणार आहे. म्यॅच्युरिटी किंवा त्याआधी रक्कम काढण्याबाबतचे नियम सोपे होणार आहेत. म्यॅच्युरिटीची रक्कम काढण्याचे बंधन 33 टक्क्यांहून 60 टक्के केली जाणार आहे.

युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन (युलिप) ग्राहकांसाठी मिनिमम लाईफ कव्हर कमी होणार आहे. सध्या एका वर्षाच्या हप्त्याच्या दहा पट होते ते घटवून सात पट केले जाणार आहे. यामुळे रिटर्न जास्त मिळणार आहे.

एन्डोव्हमेंट प्लॅन, जो कमीत कमी दहा वर्षांचा असेल, त्यासाठी सरेंडर व्हॅल्यू तीन वर्षांवरून दोन वर्षे केली जाईल.

अनेकदा असे होते की, ग्राहक काही काळानंतर हप्ता भरण्यास सक्षम नसतो. तेव्हा पॉलिसी बंद होते. अशा पॉलिसीधारकांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. पाच वर्षांनंतर हा ग्राहक त्याचा हप्ता 50 टक्क्यांपर्यंत कमी करून घेऊ शकतो. याशिवाय रिवायवल प्लॅनलाही दोन वर्षे वाढवून पाच वर्षे केला जाऊ शकतो.