
सामना प्रतिनिधी । मुंबई
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राज्यातल्या तेरा जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात ठाणे. सिंधुदुर्ग जिल्हा तसेच नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.
राज्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 13 शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडल्या आहेत. या मंडळाच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय शाळांच्या योजनेचे आज उद्घाटन झाले.























































