US Firing – अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी; संशयित ताब्यात

अमेरिकेतील राष्ट्रपती निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हाईट हाऊसपासून काहीच अंतरावर हा गोळीबार झाला असून यात नॅशनल गार्डच्या दोन जवानांसह तीन जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता ही घटना घडली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाने व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची पुष्टी केली. घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तपास पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असन त्याची चौकशी सुरू आहे. रहमानउल्लाह लकनवाल असे संशयित आरोपीचे नाव असून तो अफगाणिस्तानचा नागरिक आहे. रहमानउल्लाह 2021 मध्ये अमेरिकेत दाखल झाला. या घटनेमागील त्याचा हेतू काय होता याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी वॉशिंग्टन डीसीच्या संरक्षणासाठी अतिरिक्त 500 सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले. तसेच 2021 मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत प्रवेश करण्यास परवानगी मिळालेल्या लोकांची पुन्हा एकदा कसून तपासणी करण्याचे आदेशही ट्रम्प यांनी दिले आहेत.