Iran Israel War – पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही, पुतिन यांचे सूचक विधान; युद्धाची तुलना कोविड-19 शी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी मोठे आणि सूचक विधान केले आहे. युद्धात पुढे काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. इराण युद्धाचे परिणाम कोविड-19 महामारीइतकेच गंभीर असू शकतात, असे पुतिन यांनी म्हटले आहे. मॉस्कोमधील एका व्यावसायिक कार्यक्रमात संबोधित करताना पुतिन यांनी इराण युद्धावर भाष्य केले. या युद्धामुळे लॉजिस्टिक्स, उत्पादन आणि पुरवठा साखळी आधीच विस्कळीत झाली आहे, हायड्रोकार्बन, धातू आणि खत क्षेत्रांवर दबाव वाढला आहे, असे पुतिन यांनी पुढे नमूद केले.

युद्धात सामील असलेले देश पुढे काय होईल याचा अंदाज लावू शकत नाहीत. कोरोना महामारीप्रमाणेच हे संकट अनेक देशांमधील विकासाचा वेग मंदावू शकतो. जागतिक अर्थव्यवस्था कोसळत आहे. या संघर्षात सहभागी असलेले देशसुद्धा कशाचाही अंदाज लावू शकत नाहीत. आमच्यासाठी तर हे आणखी कठीण आहे, असे पुतिन पुढे म्हणाले.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या आशा मावळत आहेत. यामुळेच गुरुवारी तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट नॉर्थ सी क्रूड 5.2 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 107.54 डॉलरवर पोहोचले, तर अमेरिकेचा मुख्य तेल करार, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट, 4.9 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 94.71 डॉलरवर पोहोचला.

इराणने कराराचे पालन केले नाही तर, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिला. इराणची सैन्य शक्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे आणि ते एका करारासाठी याचना करत आहे, असे ट्रम्प म्हणाले. यापूर्वी, तेहरान अमेरिकेच्या प्रस्तावाचा आढावा घेत आहे. परंतु युद्ध संपवण्यासाठी कोणतीही वाटाघाटी झालेली नाही, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले होते.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेले पेंटागॉन, दोन मरीन एक्सपेडिशनरी युनिट्स तैनात करण्याच्या प्रक्रियेत आहे. याद्वारे सुमारे 5 हजार मरीन सैनिक आणि हजारो इतर नौदल कर्मचारी या प्रदेशात तैनात केले जातील.