सौदी अरेबियाने 40 देशांतील चिकन अंड्यांवर का घातली बंदी, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरेबियाने हिंदुस्थानसह 40 देशांमधून चिकन आणि अंडी यासह पोल्ट्री उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली. सौदी फूड अँड ड्रग अथॉरिटी (SFDA) ने याबाबत एक आदेश जारी केला आहे. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आणि देशाच्या बाजारपेठेत अन्न सुरक्षा मानके मजबूत करण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे कळते. अहवालानुसार, जागतिक आरोग्य परिस्थितीनुसार ही यादी वेळोवेळी बदलली जाऊ शकते, असे SFDA ने म्हटले आहे. सौदी अरेबियामध्ये काही देशांवर 2004 पासून बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य धोका आणि आंतरराष्ट्रीय अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंदुस्थानसह 40 देशांवर बंदी

हिंदुस्थानसह अफगाणिस्तान, अझरबैजान, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, बोस्निया आणि हर्जेगोविना, बल्गेरिया, बांगलादेश, तैवान, जिबूती, दक्षिण आफ्रिका, चीन, इराक, घाना, पॅलेस्टाईन, व्हिएतनाम, कंबोडिया, कझाकस्तान, कॅमेरून, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, लाओस, लिबिया, म्यानमार, युनायटेड किंग्डम, इजिप्त, मेक्सिको, मंगोलिया, नेपाळ, नायजर, नायजेरिया, हाँगकाँग, जपान, बुर्किना फासो, सुदान, सर्बिया, स्लोव्हेनिया, आयव्हरी कोस्ट आणि मॉन्टेनेग्रो या देशांवर बंदी घालण्यात आली आहे.

16 देशांवर आंशिक बंदी

ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली, बेल्जियम, भूतान, पोलंड, टोगो, डेन्मार्क, रोमानिया, झिम्बाब्वे, फ्रान्स, फिलीपिन्स, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रिया आणि काँगो या देशांवर आंशिक बंदी घालण्यात आली आहे.

DGCIS च्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत हिंदुस्थानची पोल्ट्री निर्यात दुप्पटीहून अधिक वाढली असून $१४९ दशलक्ष झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अंडी आणि अंड्याची उत्पादने यासारख्या पोल्ट्री उत्पादनांची निर्यात $७१.१६ दशलक्ष होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पोल्ट्री निर्यात 1,288.63 कोटी होती. संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानसारख्या देशांकडून होणाऱ्या जोरदार मागणीमुळे हिंदुस्थानच्या पोल्ट्री निर्यातीत वाढ झाली आहे.