
युक्रेनने रशियाच्या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर रविवारी ड्रोन हल्ला केला. युक्रेनियन सैन्याने रशियावर केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात 40 हून अधिक रशियन फायटर विमानांचं नुकसान झालं आहे. ओलेन्या आणि बेलाया दोन एअरबेसवर हा हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने केलेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर, ओलेन्या एअरबेसवर अनेक रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना आग लागली आहे. युक्रेनचे ड्रोन रशियन हद्दीत दूरवर जाण्यात आणि Tu-95, Tu-22 तसेच महागड्या आणि दुर्मिळ A-50 विमानांना नुकसान पोहोचवण्यात यशस्वी झाल्याचे युक्रेन सुरक्षा सेवा (एसबीयू)च्या अधिकाऱ्याने सांगितले. ही विमाने रशियासाठी खूप महत्त्वाची आहेत.
रशियातील इर्कुत्स्कच्या दुर्गम भागात असलेल्या “बेलाया” हवाई तळावर हा हल्ला झाला असून “ओलेन्या” हवाई तळावरही आग लागल्याचे एसबीयूने म्हटले आहे. मात्र अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.