
इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळामुळे विमानाचा प्रवास महागला आहे. प्रवाशांना दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासालाही याचा फटका बसला आहे. दुबईचे भाडे तर तिप्पट झाले आहे.
इंडिगोमुळे देशांतर्गत विमान सेवा चांगलीच कोलमडली आहे. त्याचा फटका तिकिटाच्या दराला बसला आहे. पुणे-गुवाहाटीसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावर विमानाचे भाडे 18 हजार ते 31 हजार रुपये एवढे झाले आहे. 11 डिसेंबर रोजी दिल्ली ते बंगळुरू मार्गावरील भाडे 18 हजार ते 22 हजार रुपये झाले.
जर तुम्ही या काळात परेदशी टुरचा विचार करत असाल तर थांबा. कारण केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशाचे उड्डाणही दुप्पट-तिप्पट महागले आहे. दिल्ली ते दुबईच्या एकमार्गी विमानाचे तिकीट 55 हजार रुपये एवढे झाले आहे. इंडिगोची सेवा ढासळण्याआधी या मार्गावर विमानाचे साधारण तिकीट दर 18 ते 22 हजार रुपये एवढे होते. म्हणजे तिकीट दरात तीनपट वाढ झाली आहे. दिल्ली-मॉरिशस तिकीट 40 ते 45 हजार रुपयांवरून थेट 74 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीवरून कॅनडाला जाण्याचे तिकीट एक ते सवालाखावरून 1.4 लाख रुपये एवढे वाढले आहे. दिल्ली-हाँगकाँग रुटचे भाडे 50 हजार रुपयांच्या पार गेले आहे.

























































