इंटरनेट सेवा- रौप्य महोत्सवी वर्ष

366

>> रविराज गंधे

मोबाईल स्क्रीनवर ‘typing…’ अशी अक्षरं झळकू लागली की, मोबाईल टेक्स्टिंगच्या गुलाबी जमान्यात वाढलेल्या तरुण पिढीच्या हृदयाची धडधड वाढू लागते. आपल्या सर्वांची लाडकी इंटरनेट सेवा आपल्या वयाची पंचविशी पूर्ण करीत आहे. 15 ऑगस्ट 1995 रोजी विदेश संचार निगमने हिंदुस्थानात ही सेवा सुरू केली. हिंदुस्थानभर विखुरलेल्या जवळपास 358 ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवणाऱया सर्व्हिस प्रोव्हायडरचा लाभ आज हिंदुस्थानातील 70 कोटी लोकांना होत आहे.

टीम बर्नर्स ली यांनी इंटरनेट संगणक प्रणालीचा 1990 साली शोध लावला आणि जगाचे चित्र पालटले. स्थळ, काळ आणि वेगाच्या सर्व मर्यादा ओलांडून क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱयापर्यंत असलेल्या व्यक्तींशी सहजी संवाद साधणारं हे स्वस्त विश्वसनीय आणि गतिमान तंत्र अल्पावधीतच लोकप्रिय झालं. या संवादाला ऑडिओ, व्हिडीओ, फोटो आणि संगणकीय करामती यांची जोड मिळाल्यावर तर ही प्रणाली आबालवृद्धांच्या गळ्यातील ताईत न बनती तरच नवल!

इंटरनेट सेवेच्या फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट यूटय़ूब अशा अनेक ऍप्सचा वापर मोठय़ा प्रमाणावर लोक करीत असतात. फेसबुक लाईव्ह, व्हिडीओ कॉलिंगचा सर्रास वापर होत आहे. समाज माध्यमांच्या लोकप्रियतेचं कारण म्हणजे एखादी बातमी, माहिती, आपलं मत किंवा विचार हे विनासायास सहज व्यक्त करण्याचं आणि दुसऱया व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचवता येण्याचं प्रभावी साधन हे आहे. पूर्वी समाजापुढे माहिती, बातमी यायची ती वर्तमानपत्र, रेडिओ किंवा टीव्हीद्वारे. सदर माहिती-बातमी संपादकीय चाळणीतून त्यांच्या विचार अन् धोरणाला अनुसरून लोकांपुढे यायची आणि ती खरी आहे हे मान्य करण्यावाचून पर्याय नसायचा. त्यासंदर्भात आपलं मत, विचार, भावना मांडण्याची सुविधा, हक्क लोकांना होता. आजही आहे, परंतु ते विचार, मत संपादकांना छापण्यायोग्य अथवा प्रसारित करण्यासारखे वाटले तरच ते लोकांपर्यंत पोहोचायचे. ही संधी अर्थातच मूठभर लोकांना मिळायची. समाज माध्यमांनी हा अडसर दूर केला आणि सर्वसामान्यांना राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा अनेकविध घडामोडी, बातम्यांविषयी आपली मतं, विचार जगासमोर मांडण्याची संधी दिली आणि हेच समाज माध्यमांचं मोठं बलस्थान आहे. समाजातल्या अतिसामान्य गरीब, शेतकरी, गृहिणी, मजूर, फेरीवाला… सर्वांना व्यक्त होण्यासाठी समान व्यासपीठ लाभलं.

माध्यमांच्या या ताकदीचा सर्वसामान्य माणसं एखाद्या सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयासंदर्भात प्रश्न आणि समस्यांच्या अनुषंगाने जनमत तयार करण्यासाठी वापर किंवा दुरुपयोग करू लागले आहेत.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सामूहिक बलात्कार प्रकरण, निवडणुका, विविध विषयांची आंदोलने अशा अनेक घटना आणि प्रसंग यांच्या अनुषंगानं एका विशिष्ट विचारसरणीचे जनमत तयार होण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे दिसते. आज समाज माध्यमांवर एखादी बातमी व्हायरल झाली तर सरकारला- प्रशासनाला त्याची तातडीने दखल घ्यावी लागते. आज देशातला सामान्य माणूसदेखील ट्विटरद्वारे पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकतो आणि त्याचे उत्तरही पंतप्रधान कार्यालयातून त्वरित मिळते. ही या माध्यमांची खरी ताकद आहे. समाज माध्यमांची सकारात्मक आणि विधायक बाजू आहे. त्यामुळे खऱया अर्थाने लोकशाहीचे जतन होते. काही प्रसंगी मात्र एखादा राजकीय नेता, समाजसेवक, साहित्यिक, कलावंत पुराणातील दाखले देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः राजकारण, धर्म आणि जाती- जमातीच्या नावावर मोठय़ा प्रमाणावर या माध्यमाचा गैरवापर होताना दिसतो.
या सर्वांवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याची चर्चा वारंवार होताना दिसते. आजच्या घडीला विशिष्ट ट्रेडिंग बातम्या घृणास्पद अपमानजनक मजकूर आणि धार्मिक विद्वेष पसरविणाऱया छायाचित्रांवर नजर ठेवणारी किंवा त्यावर कायदेशीर कारवाई करणारी कुठलीही अधिकृत कायदेशीर यंत्रणा नाही, कायदा नाही. सोशल मीडिया कम्युनिकेशन हबची स्थापना करण्याबाबत सरकारची सूचना न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिक्षेप होतो म्हणून फेटाळून लावली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखली जावी असे न्यायालयाचे म्हणणे असले तरी वेब सीरिजवरील मालिकांमधील वाढता लैंगिक हिंसाचार, धार्मिक विद्वेष असलेला आशय प्रमाणित केला जावा अशी सूचना माहिती व प्रसारण खाते आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनला न्यायालयाने केली आहे. तूर्तास आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे गरज पडल्यास पोलीस खात्याच्या सायबर गुन्हे शाखेतर्फे हटविली जातात आणि त्यांच्यावर कारवाई होते. गेल्या वर्षी देशभरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी एकूण 106 वेळा इंटरनेट बंदी काही काळासाठी लागू केली होती. जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या लोकशाही देशांमध्ये हे इंटरनेट बंदीसाठी हिंदुस्थानचा पहिला क्रमांक लागतो.

आज खऱयाखोटय़ा अफवा पसरवणाऱया चुकीच्या पोस्ट व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर इतक्या मोठय़ा प्रमाणावर येत असतात की, आता टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांना खऱया बातम्या आणि व्हिडीओ कुठले आणि फेक बातम्या, व्हिडीओ कुठले हे सांगणारे व्हायरल चेकसारखे कार्यक्रम प्रक्षेपित करावे लागत आहेत. तसेच वृत्तपत्रांमध्येदेखील फेक न्यूजच्या नावाखाली अशा आशयाची शहानिशा करणारी सदरे चालवली जात आहेत. अर्थात यातील विरोधाभास असा की, हीच टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्र समाज माध्यमातील या गोष्टींना बेसुमार प्रसिद्धी देऊन वातावरण प्रदूषित करीत असतात. हा भाग अलाहिदा. हिंदुस्थानात जवळपास दहा कोटी लोक दररोज विविध फोटो आणि मजकूर अपलोड करीत असतात. त्यातील 60 टक्के लोक त्याची सत्यता पडताळून न पाहता फॉरवर्ड करीत असतात. त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडण्याचा धोका संभवतो.

अर्थात सर्वच माध्यमकर्मी समाज माध्यमांचा असा चुकीचा वापर करतात असे नाही. फेसबुक, व्हॉट्सऍपवर साहित्य, कलाविषयक, सामाजिक, राजकीय, विज्ञान अशा अनेक विषयांवरील दर्जेदार, माहितीपूर्ण लेख वाचायला मिळतात. सामाजिक, राजकीय विषयांवरील अफलातून मिम्स पाहायला मिळतात. वैद्यकीय मदत, रक्त, अवयवदान, गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत आदी विविध कारणांसाठी समाज माध्यमांवर केल्या जाणाऱया आवाहनांना चांगला प्रतिसाद मिळतो. समाज माध्यमांचा खरा लाभ घ्यायचा असेल, स्वातंत्र्य उपभोगायचं असेल, वैचारिक देवाणघेवाण करून परस्परांच्या भावभावनांचे, जाणिवांचे आदान-प्रदान करायचा असेल तर आपल्या अभिव्यक्तीवर आपणच स्वतः थोडंसं बंधन घालून समाज माध्यमांना सकारात्मक करण्याची गरज आहे. इंटरनेट सेवेने आपली पंचविशी ओलांडताना एवढी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या