इंटरनेटच्या वापरामुळे राज्याच्या जीएसटीत वाढ, टेलीकम्युनिकेशन्समुळे वाढला महसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम होऊन राज्याच्या महसुलावर परिणाम होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे या काळात वर्क फ्राँम होम, ऑनलाईन शिक्षण आणि मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर वाढल्याने दळणवळण, ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून राज्याच्या जीएसटीमध्ये 11. 18 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी महसुलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या काळात इंटरनेटच्या वापरामुळे राज्याच्या जीएसटीमध्येही वाढ झाल्याचे राज्याच्या वित्त खात्याच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार टेलीकम्युनिकेशन्स, ब्रॉडकास्टिंग अँड इन्फर्मेशन सप्लाय सर्व्हिसच्या माध्यमातून जीएसटीमध्ये 11. 18 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. या पाच महिन्याच्या काळात राज्याच्या तिजोरीत सुमारे 15 हजार 766 कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा झाला. त्यापैकी सुमारे 1 हजार 762 कोटी रुपयांचा जीएसटी टेलीकम्युनिकेशन्सच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा झाला.

कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर जवळपास 120 टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल मध्यंतरी सादर झाला होता. कोरोना काळात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 25 मार्चनंतर स्मार्टफोनचा वापर 50 टक्क्यांनी वाढला. ऑफीसच्या कामासाठी स्मार्टफोनच्या वापरात 100 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत 84 टक्के लोकांनी स्मार्टफोनवर शासकीय योजना, हवामानाची तर 83 टक्के लोकांनी आँलाईन बँकिंग बिले भरण्यासाठी फोनचा वापर केला. त्याशिवाय 70 टक्के वापर व्हिडीओ ओटीटी, 60 टक्के वापर ऑडिओ ओटीटी आणि मोबाईलवरील गेमचा वापर 62 टक्के झाला. त्यामुळे या माध्यमातून मिळणाऱ्या जीएसटीमध्येही वाढ झाल्याचे दिसून आल्याचे वित्त खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंटरनेटच्या वापरात राज्य आघाडीवर
पूर्वी इंटरनेटच्या वापरात शहरी भाग आघाडीवर होता. पण आता ग्रामीण भागातही इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात इंटरनेटच्या वापराचे प्रमाण सर्वाधिक अधिक आहे. त्यानंतर केरळ, हिमाचल, प्रदेश व हरियाणाचा क्रमांक लागतो.