आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; निरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस

हिंदुस्थानातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी इंटरपोलने पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी निरव मोदीच्या पत्नीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी निरव मोदी आणि त्याच्या पत्नीवर मनी लॉडरिंगचे गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने निरव मोदीचा भाऊ नेहल आणि बहिण पूर्वीविरोधातही नोटीस जारी केली आहे. इंटरपोलने त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.

ब्रिटनमध्ये अटकेत असलेल्या निरव मोदीची न्यायालयीन कोठडी 6 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. 6 ऑगस्टला न्यायालयात हजर केले असता त्याच्या कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायालयात त्याच्या प्रत्यार्पणाबाबत सुनावणी सुरू आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यानंतर निरव मोदी लंडनच्या वॉड्सवर्थमधील तुरुंगात आहे. पीएनबी बँकेतील 13 हजार कोटींच्या घोटाळ्यात निरव मोदी प्रमुख आरोपी आहे. त्याच्या विरोधात देशातील तपास यंत्रणांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी निरव मोदीसह अँटीगुआमध्ये असणाऱ्या मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचेही प्रयत्न सुरू आहेत.

निरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबतच्या दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील सुनावणी जिल्हा न्यायाधीश सॅम्युअल गुजे यांच्य अध्यक्षतेखाली झाली आहे. तर लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेली दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे. आता इंटरपोलने निरव मोदीच्या पत्नीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावल्याने त्याच्या पत्नीला अटक करणे आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करणे शक्य होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या