
>> देवेंद्र पेम, लेखक-दिग्दर्शक
लॉकडाऊनच्या आधी आमच्या अनामय नाटय़संस्थेच्या ‘प्लँचेंट’ नाटकाचे प्रयोग नुकतेच सुरू झाले होते. मला आठवतंय, 8 मार्च रोजी ‘प्लँचेट’चा 14 वा प्रयोग मास्टर दीनानाथ नाटय़गृहात झाला होता. नवीन नाटक असल्याने त्याच्या जाहिराती जोरात होत्या. एप्रिल- मेमध्ये सुट्टय़ांमध्ये जास्त प्रयोग होतील अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊनमुळे सगळं थांबलं. त्यामुळे मी निराश झालो. केवळ मराठीच नव्हे तर भाषांतही माझी नाटकं चालू होती. ‘ऑल दी बेस्ट’, ‘लाली लिला’ नाटकांचे गुजरातीत प्रयोग सुरू होते. या सगळ्यालाच खो बसला.
परिस्थिती लवकर काही सुधारत नाही, लॉकडाऊन लांबतोय, म्हटल्यावर मी ‘सरप्रायझिंगली’ सगळं ‘पॉझिटिव्हली’ घेतलं. प्रयोग सुरू होतील तेव्हा होतील, पण हा काळ सत्कारणी लावण्यासाठी काय करता येईल, त्याचा विचार वेला. मला स्वतःला लेखक- दिग्दर्शक किंवा मयुरेश, मनमीतला अभिनेता म्हणून काय करता येईल, याचा विचार केला. मी लिहायला घेतलं. निर्माता म्हणून प्रयोग अरेंज करणे, त्या ठिकाणी जाणं… या सगळ्यामुळे लेखन करायला वेळत मिळत नव्हता. म्हणजे डोक्यात होतं पण कागदावर उतरत नव्हतं. म्हणून मी नाटक, सिनेमा आणि वेबसीरीजच्या दृष्टीने लिहायला घेतलं. माझी मुलं, मयुरेश आणि मनमीतला अभिनयाचे ऑनलाईन वर्कशॉप करायला लावले. त्यांना पुस्तके दिली. त्यांनीही काही व्हिडियो बनवून मला दाखवले. असा आतापर्यंतचा सगळा काळ गेलाय.
लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने वाढणे, बाहेर रुग्णांची वाढणारी संख्या, परिचयाच्या माणसांचं जाणं, यामुळे लेखनाचा फोकस हलत होता. पण ते सगळं बाजूला सारलं आणि लिहायला लागलो. मी एकच विचार केला की क्रीप्ट हातात असली की पुढे जेव्हा कधी इंडस्ट्री सुरू होईल तेव्हा बोलता येईल. शूटिंग हळूहळू सुरू होत आहे. नाटय़गृहे कधी सुरू होतील माहीत नाही. नवीन नाटकं येतील का, लोक थिएटरकडे वळतील का, ते काही माहीत नाही. लस कधी येणार तेपण माहीत नाही. यापुढे वेगवेगळ्या ऍडजेस्टमेंट करून सुरुवात करावी लागणार आहे. पण एक खात्री आहे की, लेखकाला पर्याय राहणार नाही. चांगल्या कंटेंटला मागणी असेल. मग ते नाटक असो, सिनेमा किंवा वेबसीरीज.
आमची ‘ऑल द बेस्ट’ अकॅडमी आहे त्यामार्फत आम्ही वर्कशॉप घेत असतो. लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे मुंबईतूनच नव्हे, तर पुणे, सांगली, सातारा येथूनही वर्कशॉपसाठी विचारणा झाली. पण मी एकही वर्कशॉप घेतलं नाही. कारण वर्कशॉप घेतलं तर प्रामाणिकपणे ते घेतलं पाहिजे. मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागला असता. तिथे वेळ दिला तर इकडे लेखनाचा फोकस शिफ्ट झाला असता.
या दिवसांनी स्वतःकडे नव्याने बघायला शिकवलं. काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं होतं. त्याकडे पुन्हा नव्याने लक्ष देता आलं. त्यातून नवीन उभारी मिळाली.
कोचरेकरांचा कुकिंग क्लास
निर्माते संतोष कोचरेकर चांगले कुक आहेत. एकेकाळी त्यांची अनेक ठिकाणी कँटीन होती. ती आता नाहीत. त्यांच्याशी माझं वेगळंच टय़ुनिंग आहे. आमची छान मैत्री आहे. त्यांनी मला फोनवरून सांगणं आणि मी माझ्या घरच्यांसाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी काही पदार्थ बनवणं हा उद्योगही मी लॉकडाऊनमध्ये केला. त्याच्यात मी 25 पदार्थ बनवायला शिकलो. आतापर्यंत कुकिंगशी काही संबंध आला नव्हता पण ते काम लॉकडाऊनमध्ये केले.
आपली काळजी आपण घेऊया
या दिवसांनी स्वतःची कामं स्वतःच करायला शिकवलं. माझी पत्नी बँकेत नोकरीला असल्याने संपूर्ण लॉकडाऊनभर ती कामाला जातेय. याच दिवसांत तिचं प्रमोशन झालं. ती मॅनजर झाली. तिची ट्रान्स्फर झाली. मग तिला रिक्षाने पाठवण्याऐवजी स्कूटरने सोडायला आणायला जाण्याचं काम मी आणि मुलगा करतो. सांगायचा मुद्दा असा की आपणच आपली काळजी घेऊन, कोणावरही फारसं अवलंबून न राहता, आपल्याला कामं करावी लागणार आहेत.





























































