माणसात विरघळणारा माणूस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद शिंदे

अनंत महादेवन. भाषेपलिकडील कला जगणारा कलावंत. त्यांचे चित्रपट जगभरात मानाचे स्थान कमावतात.

‘अगदी उद्याच? अहो काय बोलताय? एखाद्या वर्तमानपत्रासाठी तुम्हाला मुलाखत पाहिजे आणि अगदी उद्याच भेटूया असं तुम्ही कसं म्हणू शकता? नाही नाही, पुन्हा कधीतरी साधारण आठवडाभर आधी वेळ घेऊन आपण भेटूया. थोडेतरी एटीकेटस् पाळा…’

असं काहीतरी ऐकायला मिळेल असं वाटलं होतं. पण नाही. ते साधे आहेत खूप, असेच मिसळून जातात माणसात, विरघळून जातात जवळच्या मंडळींमध्ये. अगदी दुसऱयाच दिवशी वेळ ठरली. ‘सकाळी साडेनऊला तुम्हाला वेळ आणि ठिकाण सांगतो.’ बरोबर नऊ सत्तावीसला त्यांचा फोन आला… साडेअकरा वाजता ऑफिसला भेटू. जसजसा काटा दहाच्या दिशेने सरकायला लागला तसा मुंबईतला पाऊस वाढायला लागला, साठायला लागला. मग पुन्हा फोनाफोनी. काय करूया? मग संध्याकाळी भेटायचं ठरलं आणि भेटलो. ज्यांच्याबद्दल मी बोलतोय ती व्यक्ती म्हणजे माझे अतिशय आवडते आणि आदरणीय ‘अनंतजी महादेवन’ (लेखक- दिग्दर्शक- अभिनेते)

माझा एक जवळचा मित्र एका अतिशय मोठय़ा इस्पितळात ऍडमिट होता. कारण त्याला तिसरा हार्टऍटॅक येऊन गेला होता. पहिल्या दोन ऍटॅकमुळे तिसऱयामध्ये त्याला सरावलेपण आले होते. तो इस्पितळात भरती झाला. त्याच्या बाजूला एक पेशंट होता. त्याला पहिलाच ऍटॅक आला होता, पण तो खूप भेदरून गेला होता. तो शहरातला मोठा डॉन आहे असं समजतं… त्याला भेटायला येणारे लोक त्याची ख्याती सांगत होते. त्याच्या एका सांगण्यावर त्याचे पंटर शहरातल्या अनेकांना संपवीत होते. खलास करीत होते. पण जो अनेकांचे जीव घेतो तेव्हा त्याच्याच जिवावर शरीर नाराज होतं आणि त्याला ऍटॅक येतो पहिलाच. त्याची परिस्थिती आणि शेजारच्या बेडवर तीनदा ऍटॅक येऊन गेलेला व्यक्ती यांच्यातल्या कॉन्फ्लिक्टचा हा सिनेमा. सिनेमाचं नाव ‘स्टेईंग अलाईव्ह.’ तो जो तीन ऍटॅक आलेला जो रुग्ण होता तो अनंतजींचा मित्र. पेशानं लेखक सुजीत सेन. आजारातून उठल्यावर त्यांनी अनंतजींना हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यातून एक सृजन जन्मलं ‘स्टेईंग अलाईव्ह’ नावाची कलाकृती.

त्या आधी अनंतजींनी ‘दिलविल प्यार व्यार’, ‘अक्सर’, ‘दिल मांगे मोअर’, ‘अनामिका’ हे सिनेमे दिग्दर्शित केले होते… आणि अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द जोरात सुरू होती. जेव्हा ‘स्टेईंग अलाईव्ह’ काही जाणकार लोकांनी पाहिला आणि ते अनंतजींना म्हणाले, ‘ये फिल्म आपने डिरेक्ट की हैं?’ ते हो म्हणाले. ‘अगर तुम ये बना सकते हो तो क्या बना रहे हो?’ (ये म्हणजे त्यांचे आधीचे काही सिनेमे)

तिथं ठिणगी पडली आणि आपण निवडलेली वेगळी वाट दखल देते हा त्यांना विश्वास मिळाला. त्यातून मग एका नव्या शोधाला सुरुवात झाली. त्यांना हव्या असलेल्या विषयाला गवसणी घालण्याचा ध्यास आणि त्या ध्यासाचं मूर्त स्वरूप म्हणजे ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा सिनेमा… मराठी सिनेमाच्या काही उत्कृष्ट सिनेमांची जर यादी काढली तर त्यात स्थान मिळवणारा हा सिनेमा. हा सिनेमा अनंतजींनी दिग्दर्शित केला आणि त्याचं पटकथा लेखनही… हा सिनेमा जगभरातल्या महोत्सवातून फिरलाही अन् जगद्विख्यात झाला. खरं तर अनंतजींना मानलंच पाहिजे अशा विषयाला हात घातला म्हणून. पण सचिन खानोलकर- त्यांच्या पत्नी बिंदिया खानोलकर यांनाही मानलं पाहिजे.

‘मी सिंधुताई सपकाळ’ने एक मोहर उमटवली. तद्वतच या सिनेमासाठी त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘दोन राष्ट्रीय पुरस्कार…?’ हो… एक पटकथेसाठी संजय पवार यांच्यासोबत विभागून आणि एक स्पेशल ज्युरी पुरस्कार खास अनंत महादेवन यांच्यासाठी. आणि मग सृजनाचं झपाटलेपण सुरू झालं. जणू काही हेच हवं होतं आणि मी आता माझ्या योग्य मार्गावर आहे. त्यातून एकाहून एक सुंदर कलाकृतींनी जन्म घेतला. ‘रेड अलर्ट’ त्यांनी या सिनेमाबद्दल सांगितल्यावर माझ्या मनात हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मग ‘रफ बुक’ हा आणखी विचार करायला लावणारा सिनेमा. एक स्वातंत्र्यसैनिक फक्त आपलं असणं मागतोय तो गौर हरी दास्तान (स्तां) मग ‘रखमाबाई.’ जगभर फिरला हा सिनेमा सिनेमहोत्सवांतून. अप्रतिम कलाकृती म्हणून त्याचा गौरव झालाय…

आणि मग आमची भेट झाली ‘उचल्या’ या लक्ष्मण गायकवाड यांच्या आत्मचरित्रावरच्या सिनेमाच्या निमित्तानं. काही कारणांनी तो सिनेमा झाला नाही, पण त्यांच्याशी जो बंध जोडला गेला तो कायमचा… तो पुन्हा पुढे आणखी घट्ट झाला त्यांनीच दिग्दर्शित केलेला आणि मी अभिनीत केलेला ‘माईघाट’ हा सिनेमा. हा सिनेमा आता तो उत्तर निर्मिती प्रक्रियेत (पोस्ट प्रोडक्शन) असल्यानं मी त्याची कथावस्तु नाही सांगू शकणार. पण आताच हा सिनेमा जगभरातल्या अनेक चित्रपट महोत्सवांत आमंत्रित आहे.

‘मराठीतच का सिनेमा करावासा वाटला’ असं मी विचारल्यावर ते जे बोलले ते डोळे उघडणारे होते. ‘मी कुठलीही भाषा शाळेत पास होण्यासाठी शिकलो नाही. माझं शिक्षण मुंबईत झालं. मला मराठी हा भाषा विषय होता. मी ती भाषा शिकलो आणि त्याचा परतावाही मला मिळाला.’ ते जेवढी हिंदी उत्तम बोलतात तेवढीच मराठी आणि इंग्रजीही. त्यांच्यापाशी असलेला नाटकात काम केल्याचा अनुभव पदोपदी जाणवतो. ‘माईघाट’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जाणवलं, ते ‘प्रिसाईज’ आहेत. ते नटाला त्यांच्या आरेखीत कक्षेबाहेर जाऊच देत नाहीत. किती अभ्यास आणि किती ते आपल्या संहितेबद्दल जागरूक असणं. थोड खुजं वाटायला होतं. पण खूप शिकायलाही मिळतं.

कमलेश सावंत आणि मी ‘माईघाट’च्या चित्रीकरणामध्ये असताना दोन शॉटस्च्या मध्ये त्यांना विचारलं, ‘अनंतजी, तुम्ही ऍक्टर आहात. दिग्दर्शकही आहात. तुम्हाला सगळय़ा नटांना आवडणारा पॅकअप हा शब्द कसा वाटतो?’ क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले, ‘जर काम असेल, संपलं नसेल तर जे पॅकअपची वाट बघतात त्यांनी समजावं की त्यांचं पॅकअप झालं आहे किंवा त्यांचं लवकरच पॅकअप होणार आहे या इंडस्ट्रीमधून…’

[email protected]