लेखकाच्या घरात; वैद्य गुरुजींच्या वाडय़ाचा संस्कार

484

अनुराधा राजाध्यक्ष <[email protected]>

कवी दासू वैद्य… घराचा, मातीचा ठाशीव संस्कार त्यांच्या मनावर झालाय… तेच संस्कार त्यांच्या कवितांमधून झिरपतात… मुलीपर्यंत पोहोचतात….

नांदेडमधल्या मुदखेड या छोटय़ाशा गावात जन्म झाला माझा. वडील संस्कृतचे शिक्षक. दहावीपर्यंत त्याच गावात होतो मी. तिथल्या वाडय़ाचा, वातावरणाचा खोल संस्कार झाला आहे माझ्या व्यक्तिमत्त्वावर हे जाणवतं मला. गावात गल्ल्यांची नावं जातीवाचक होती. सोनार गल्ली, लोहार गल्ली, ब्राह्मण गल्ली, कोमटी गल्ली, पण उच्चारात जात असली तरी वर्तनात जात दिसली नाही कधी. म्हणजे कोणीही कोणाच्याही घरी कधीही जाऊ येऊ शकत होतं. मुळात आम्ही ज्या वाडय़ात राहायचो, तो वाडा आमचा नव्हता हेच मला खूप उशिरा कळलं. कारण त्या वाडय़ाला म्हणायचे सगळे वैद्य गुरुजींचा वाडा. म्हणजे राहत होतो आम्ही तिथे भाडय़ानं, पण तो ओळखला जायचा माझ्या वडिलांच्या नावानं. खूप प्रेम आणि आदरभाव होता त्या गावात सगळ्यांना एकमेकांबद्दल. कोणीही कुणाच्याही स्वयंपाकघरात शिरावं, ओसरीवर बसावं. प्रायव्हसी वगैरे असते हे माहीतच नव्हतं कोणाला. रात्री दहा वाजले तरी गप्पा मारत बसलेली असायची मंडळी. असा मिळून-मिसळून राहण्याचा संस्कार झाला तिथे.’’ दासू वैद्य त्यांच्या बालपणीच्या ग्रामीण जीवनशैलीबद्दलचे बारकावे सांगत होते.

त्यांच्याकडे कोणी आलं तर ओसरीवर बसायला पाट ठेवला जायचा. ते म्हणाले, तिथे वाचन असं झालंच नाही त्यांचं. कारण तशी पद्धतच नव्हती. वर्तमानपत्राचंही प्रस्थ नव्हतं. टीव्हीचा पत्ताच नव्हता. रेडिओही क्वचित ऐकला जायचा, पण त्यांच्या घरात २४ तास माणसांचा राबता होता. त्यामुळे माणसं खूप वाचली त्यांनी. बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘त्या घरात आमच्या बरोबर कोण कोण राहत होतं असं जर विचारलं तर मी सांगेन, चिमण्या, उंदीर, साप, सरडा, पाल, ढेकूण, गाय, म्हैस सगळेच राहायचे. साप होते, पण  कधी कुणाला चावल्याचं स्मरत नाही. चुलीतल्या राखेत उबेला बसलेले विंचू असायचेच.’’

सहजीवनाचा हा असा भन्नाट विचार दासू वैद्य यांच्या मनात रुजला तो त्या घरामुळेच. हा संस्कारच दासू वैद्य यांच्यातल्या लेखकाला घडवत गेला. त्यातूनच ‘तूर्तास’, ‘क कवितेचा’ असे कवितासंग्रह, ‘एक लेखक लिहिणार आहे’सारख्या अनेक एकांकिका, नभोनाटय़, पथनाटय़, बालकथासंग्रह, ‘तुकाराम’, ‘बिनधास्त’, ‘आजचा दिवस माझा’ अशा चित्रपटांसाठी गीतलेखन झालं आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं. ‘‘आमच्या घरी येणारे जाणारे खूप. खेडय़ांमध्ये लोकांकडे वेळच वेळ. बद्रुद्दीन नावाचा पोस्टमन पोस्टकार्ड घेऊन यायचा. आई त्याला चहापाणी द्यायची, खायला द्यायची. मग गावातली आजूबाजूची सगळी माहिती त्याच्याकडून मिळायची. कधीतरी लाल शाईनं लिहिलेलं पत्र यायचं आणि ते फाडून टाकायला सांगायची आई. कारण ते पत्र मृत्यूची बातमी देणारं असायचं. दुपारच्या वेळी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारायला बायका जमायच्या. शुक्रवारच्या कहाण्या वगैरे तिथेच ऐकल्या मी. कान तयार झाला माझा त्यातून. कीर्तनं खूप व्हायची गावात. प्रचंड आवडायची मला ती. त्या कीर्तनकारांच्या बहुश्रुततेचा संस्कार, लेखक म्हणून, व्यक्ती म्हणून माझ्यावर झाला. त्यावेळी त्या शब्दांचा अर्थ कळत नव्हता किंवा भजन तुकारामाचं आहे की ज्ञानेश्वरांचा अभंग आहे हे कळत नव्हतं, परंतु हरिनाम सप्ताहात वीणा खाली ठेवायची नाही अशी जी प्रथा होती, त्यात कीर्तनं, भजनं ऐकली खूप.

शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्या कथा जेव्हा नंतर मी वाचल्या तेव्हा लक्षात आलं की, हे आयुष्य तर मी जगलो आहे. पेरूची बाग म्हणजे जामवाडी. तिथे कुंपणातून घुसून, चार मित्रांबरोबर झाडावर चढून, पोपटानं खाल्लेले म्हणजे पाखरखाणी पेरू आम्ही खायचो. हातात काठी घेऊन वॉचमन उभा असायचा. अशा कुठल्याही ठिकाणी मी सापडलो की, पहिला प्रश्न हा यायचा की, गुरुजीचा पोरगा तू, तुला हे शोभतं का? कधी कधी ‘गुरुजीचा पोरगा’ ही फारच त्रासदायक गोष्ट वाटायची मला. म्हणजे गुरुजींच्या मुलानं पेरू खाऊ नयेत की काय? तिथे मुस्लिम वस्तीसुद्धा होती. पाच पैशाला पाच पापड विकायला ते रस्त्यावर बसायचे.. त्या पापडासारखे पापड आजपर्यंत खाल्ले नाहीयेत मी, पण गुरुजींच्या मुलानं रस्त्यावर पापड खाणं शिष्टसंमत नव्हतं. गणपतीच्या दिवसांत मित्रांबरोबर खंडोबाच्या माळावर जायचो. लाल माती आणायचो. वडील मोठा आणि मी एक छोटा गणपती करायचो. आता माझी मुलगी माझ्या शेजारी बसून गणपती करते. संस्कारांची अशीच आवर्तनं एका पिढीतून दुसऱया पिढीत परावर्तित होत असतात. पोळ्याला नांगरलेल्या शेतातली म्हणजे प्रसवणारी माती आणून, त्याचे बैल करायचो. ज्वारीचे दाणे चिकटवले की, झाले त्यांचे दोन डोळे. नागपंचमीला काडीला कापूस लावून गेरू बुडवून भिंतीवर नाग काढून द्यायचो आईला.

मला शाळेचा कंटाळा. त्यावरून खूप मार खाल्लाय मी वडिलांचा. बहीण यायची शाळेत सोडायला. वर्गात बसलो की, थोडय़ाच वेळात काहीतरी कारण सांगून जायचो वर्गाबाहेर आणि शाळा सुटताना दप्तर घ्यायला परत वर्गात जायचो. माझी शाळा झालेली असायची रस्त्यावर, एखाद्या ग्राउंडवर, नाहीतर झाडावर. गणितात नापास झालो चौथीच्या सहामाहीत. गुरुजींचा मुलगा नापास म्हटल्यावर जसा काही मी खूनच केला आहे असं वागवलं गेलं मला. शाळेतून घरी यायच्या आधीच मी नापास झाल्याची बातमी घरी पोहोचली होती. बहीण खांबाला टेकून उभी होती. गेल्या गेल्या म्हणाली, नापास झाला आहेस तू, तेव्हा आत्तापर्यंत मी जे दळण आणायचं काम करायचे ते आता तू कर. घरचे, बाहेरचे नीट बोलत नव्हते. आठ-दहा दिवस गेले. धिंगाणा करणारा मी खालमानेनं जगत होतो. देव बाईंच्या मात्र ही गोष्ट लक्षात आली. देवासारख्याच होत्या त्या. विधवा होत्या. त्यामुळे कपाळावर गोंदल्याची खूण, चष्मा, हलक्या रंगाच्या कॉटनच्या साडय़ा, पायात गावाकडच्या कारागीरानं केलेली चप्पल आणि हातात पर्स असं एकंदरीत त्यांचं रूप. गावात पर्स वापरणारी ती एकमेव व्यक्ती होती. नांदेडवरून यायच्या त्या.

एकदा त्यांनी मला जवळ बोलावलं. मला वाटलं, आता त्याही मला म्हणणार, गुरुजींचा मुलगा तू, तू कसा नापास झालास? पण त्या रागावल्या नाहीत. उलट पाठीवर हात ठेवून त्यांनी चौकशी केली माझी. मग पर्स उघडली. मला वाटलं, एखादी छडी असेल आत, फोल्ड होणारी, ज्यानं त्या मला मारतील, पण त्यांनी तीन पैसे दिले मला. मला वाटलं त्यांना सुपारी, पान असं काहीतरी आणून हवंय माझ्याकडून, पण त्या म्हणाल्या, हे तुला बक्षीस. मला वाटलं, मी गणितात नापास झालो आहे हे या मराठीच्या बाईंना माहितीच नसावं. मग मीही सांगितलं नाही. त्या पैशांच्या संत्र्याच्या तीन गोळ्या घेतल्या. दुसऱया दिवशीही त्यांनी मला परत बोलावलं. म्हणाल्या, मला माहिती आहे तू नापास झाला आहेस ते. खरं तर मला तुझं कौतुक अशासाठी वाटतं, कारण आपल्या वर्गात सर्वात जास्त कविता पाठ असणारा तूच आहेस.

चौथीत असतानाच मला सातवीपर्यंतच्या सगळ्या कविता पाठ न करताच पाठ होत्या. कविता पाठ असणं हा गुण आहे हेच मला माहिती नव्हतं. त्यांनी मला मराठीच्या तासाचं मॉनिटर केलं. त्या क्षणापासून नापास झाल्याचं नैराश्य उडालं. खरं तर आज माझी ही जी मुलाखत घेतली जाते आहे, ती त्या बाईंच्या शब्दांमुळेच असं वाटतं मला. कारण त्यानंतर मी खऱया अर्थाने कवितेकडे वळलो. ‘या बाळांनो या रे या’, ‘वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ’, ‘घाल घाल पिंगा वाऱया’ अशा पुस्तकातल्या कविता मला माझं विश्व वाटायला लागल्या. गणिताचा तिटकारा का याचा आज जेव्हा मी विचार करतो तेव्हा वाटतं, ते शिक्षकच तसे होते. रागीट, वटारलेल्या डोळ्यांचे. हातात मारण्यासाठी बेशरमाचा फोक नेहमीच असायचा त्यांच्या. ते सारखे मारायचे. म्हणूनच ते राहायचे त्या गल्लीत आम्ही फिरकायचोही नाही. याउलट देव बाई…’’

माझ्या कवितेला त्या उजागर करून गेल्या. शिक्षक किती मोठा परिणाम आयुष्यावर करतात याचं हे उदाहरण आहे. अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या स्वभावांचा नकळत परिणाम दासू वैद्यांवर झाला आणि ते संस्कार त्यांच्या लेखनातून, कवितेतून अवतरले. खंडोबाच्या माळावर जेव्हा दासू वैद्य गणपतीसाठी लाल माती घ्यायला जायचे, तेव्हा तिथून गाव बघताना त्यांना विलक्षण आनंद व्हायचा. चित्रातल्यासारखी छोटी छोटी घरं, नदी, मशीद, मंदिर सगळं दिसायचं. त्यावेळीही स्वतःचं घर शोधायचा ते प्रयत्न करायचे. ते दिसायचं नाही तरी त्यांच्या मनात ते उमटलेलं असायचंच. ते म्हणतात, अजूनही कधी कधी संध्याकाळ झाली की, मला माझ्या घराच्या ओसरीत असल्यासारखं वाटतं. तिथला वास येतो, तिथला कंदील दिसतो. त्यांच्या नवीन पुस्तकाचं नावही ‘कंदील काजळी’ आहे. कारण रोज संध्याकाळी त्यांची आई जी कंदिलाची काच पुसायला लावायची लख्ख प्रकाश पडावा म्हणून तोच संस्कारांचा प्रकाश दासू वैद्यांचं आयुष्य उजळून गेला आहे. काही वेळेला आपण ठरवलेल्या गोष्टी कदाचित आपल्याकडून पूर्णत्वाला जात नाहीत, पण संस्कारांचं बीज मात्र आपोआप रुजतं. त्यातूनच शब्दांचं झाड बहरतं आणि वाचकांना सुखावतं हे दासू वैद्यांशी बोलताना मला प्रकर्षानं जाणवत होतं.

आपली प्रतिक्रिया द्या