‘ऑनलाइन’दिवाळी पहाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सावनी रविंद्र, गायिका

आम्हा कलाकारांसाठी दिवाळी म्हणजे दिवाळी पहाटचे कार्यक्रम असं समीकरण आतापर्यंत राहिलंय. यावर्षी पहिल्यांदा असं झालंय की प्रत्यक्ष कार्यक्रम नाहीत. ऑनलाईन कार्यक्रम आहेत. लाईव्ह ऑडियन्समध्ये जी दाद मिळते, ती मजा ऑनलाईनमध्ये येत नाही. यावर्षी परदेशातील काही मंडळांसाठी मी ऑनलाईन कार्यक्रम करतेय. आम्ही कलाकार मंडळी दिवाळीच्या निमित्ताने परदेशात जात असतो. पण यावर्षी तसंही काही आयोजन नाही. त्यामुळे इथूनच ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन आहे.

एक मात्र नक्की यावेळी कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करता येईल. एरव्ही काय होतं की दिवाळी प्रवासात जाते. घरच्यांसाठी वेळ देता येत नाही. सध्या मी सिंगींग स्टारच्या शूटींगमध्ये बिझी आहे. त्यामुळे मुंबईत आहे. माझे कुटुंब पुण्यात आहे. शूटींग झाल्यावर मी दिवाळीच्या आदल्या दिवशी पुण्याला जाईल. मग खरी दिवाळीला सुरुवात होईल. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेही फटाके मला अजिबात आवडत नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण होते, प्राण्यांना हानी पोचते. त्यामुळे दारुचे फटाके उडवण्यापेक्षा पॉझिटिव्हिटीचे फटाके फोडले पाहिजेत, असं मला वाटतं. या नकारात्मक वातावरणात आपल्याला गरज आहे, ती सकारात्मकतेची, परस्परांच्या आधाराची! सगळ्यांनी एकजुटीने परिस्थितीला सामोरे जाऊया.