फिजिकल एज्युकेशन काळाची गरज, शिक्षक धनंजय विटाळकर यांचे स्पष्ट मत

518

युवकांची शाळा, कॉलेजसाठी धावपळ… गृहिणींची घर सांभाळण्यासाठी धडपड… पुरुषांचा नोकरीसाठी आटापिटा… एकूणच काय तर आयुष्य रेसिंग ट्रकवर धावत असलेल्या खेळाडूंप्रमाणे वेगवान झाले आहे, पण धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते आहे. याचमुळे फिजिकल एज्युकेशन ही काळाची गरज बनलीय. हे शब्द आहेत अमरावतीतील डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ) यामध्ये फिजिकल एज्युकेशन शिक्षक असलेल्या डॉ. धनंजय विटाळकर यांचे. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फिजिकल एज्युकेशनवर दृष्टिक्षेप टाकला.

फिजिकल एज्युकेशन टीचर ते डायरेक्टर
क्रीडा क्षेत्रात करीअर करण्यास इच्छुक असलेल्यांना अमरावतीतील कॉलेजमध्ये शिक्षण घेता येऊ शकते. 12वीनंतर तीन वर्षांसाठी बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ऍण्ड स्पोर्टस् (बीपीईएस) हा कोर्स करावा लागतो. त्यानंतर दोन वर्षांसाठी बीपीएडचा कोर्स करावा लागतो. त्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्याही शाळेमध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून नोकरी मिळू शकते. तसेच एमपीएडची मास्टर डिग्री घेतल्यानंतर सीनियर कॉलेज किंवा विद्यापीठात फिजिकल डायरेक्टर म्हणून नियुक्ती होऊ शकते, असे धनंजय विटाळकर यावेळी आवर्जून सांगतात.

मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, जलतरण व कुस्तीवर मेहनत
डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमध्ये साईची ऍकॅडमी आहे. यामध्ये मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, जलतरण व कुस्ती या चार खेळांवर मेहनत घेण्यात येते. येथे वैयक्तिक क्रीडा प्रकारावर अधिक लक्ष देण्यात येते. सांघिक खेळामध्ये जास्त फाईट असते, चढाओढ दिसून येते. त्यामुळे वैयक्तिक क्रीडा प्रकारावरच दृष्टिक्षेप टाकण्यात येतो, असे धनंजय विटाळकर यांनी नमूद केले.

कोरोनामध्ये फिजिकल एज्युकेशनचा फायदा
कोरोनासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी फिजिकल एज्युकेशन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. योगा व फिटनेसमुळे कोरोना आपल्या जवळही पोहोचू शकत नाही. सर्व प्रकारच्या खेळांमुळेही शरीर सुदृढ व निरोगी राहते. या कॉलेजमध्ये फिजिकल एज्युकेशनबाबत सविस्तर अभ्यासाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेताना थिअरी व प्रॅक्टिकल या दोन्हींच्या परीक्षा द्याव्या लागतात, असे धनंजय विटाळकर सांगतात.

वडिलांमुळे ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश
माझे वडील डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे नोकरी करीत होते. त्यामुळे माझीही पावले त्याच कॉलेजकडे वळली. अमरावतीतच लहानाचा मोठा झालो. आता आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत येथेच वास्तव्य करतो. कोरोनामुळे कॉलेज बंद होते. आता 10 ऑगस्टपासून कॉलेज पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. सध्या तरी विद्यार्थ्यांना थिअरीच्या सहाय्याने फिटनेसबद्दल ज्ञान देता येईल, असे धनंजय विटाळकर यांनी पुढे म्हटले.

या खेळाडूंनी गाजवले मैदान
अनिल तोरकड, तेजस्विनी दहीकर, गोविंद कपाते, निखिल सरवान, दानीश खान या कुस्तीपटूंनी, हर्षाली रिठे, पायल अजमिरे, श्रद्धा बेलोरे, कांचनमाला पांडे, चेतन राऊत, अमित गोरे, अक्षय खुरेकर, सुमित गवाने, अनिकेत साखरे, राहुल हतवार, निहारिका परिहार या जलतरणपटूंनी, श्रुतिका पांडे, शिधांत यादव या जिम्नॅस्टने या कॉलेजमधून प्रशिक्षण घेत पुढे जाऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरी केली. या कॉलेजमधील मल्लखांबपटूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीही केलीय. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूही या कॉलेजमधून घडले, असे कौतुकोद्गार धनंजय विटाळकर यांनी याप्रसंगी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या