
ऑक्टोपॅड, तबला, ढोलकी, पखवाज अशा अनेक वाद्यांचे उत्कृष्ट वादन करणारा एक कलावंत म्हणजे तुषार देवल.
‘चला हवा येऊ द्या’, ‘फू बाई फू’, ‘हास्यसम्राट’, ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’, ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ अशा अनेक कार्यक्रमांचा संगीत संयोजक म्हणून परिचित झालेला आणि मुख्य म्हणजे तबला, ढोलकी, ऑक्टोपॅड, पखवाज अशा अनेक वाद्यांचे उत्कृष्ट वादन करणारा एक कलावंत म्हणजे तुषार देवल. तुषारचे बाबा नोकरी करत होतेच, पण त्याचबरोबर ते अनेकांना तबलावादनाचे प्रशिक्षणदेखील देत होते. तुषारने वयाच्या आठव्या वर्षापासून तबल्याचे प्रशिक्षण बाबांकडून घेतले. त्याची आई शाळेमध्ये संगीत शिक्षिका होती. त्याचे बाबा काही कार्यक्रमांसाठी वादक म्हणून काम करत होते. एकदा कीर्तनासाठी साथसंगत करण्याकरिता त्याच्या बाबांना तबलावादक म्हणून जाणे शक्य झाले नव्हते, तेव्हा बाबांनी तुषारला तिथे कीर्तनासाठी वाद्यांची सुरुवातीला साथ करायला सांगितली. नऊ-दहा वर्षे वय असलेल्या तुषारने कीर्तनाला उत्तम साथ केली आणि त्याचे खूप काwतुक झाले. तुषार म्हणतो, “शाळेमध्ये समूहगीत स्पर्धेच्या संगीत संयोजनाची जबाबदारीदेखील मी घ्यायचो. डोंबिवलीमधील प्रतिष्ठत अशा ‘लायन्स क्लब’ संगीत स्पर्धेतदेखील आमच्या गाण्याला बक्षीस मिळत होते. ’
तुषारने त्याचा मावसभाऊ श्रीपाद जाईल आणि मावशी विद्या जाईल यांच्याकडूनदेखील संगीत कलेचे प्रशिक्षण घेतले, तर गुरू विश्वनाथ शिरोडकर आणि गुरू दर्शना आठवले यांच्याकडूनदेखील त्याने तबल्याचे प्रशिक्षण घेतले.
तुषारने स्वतः देखील साधना विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून काम केले आहे. त्याची विद्यार्थिनी असणारी सायली कांबळे हिला आपण एक उत्कृष्ट गायिका म्हणून ओळखतो.
तुषारला ढोलकी, तबला, ऑक्टोपॅड, पखवाज अशी सगळीच वाद्ये वाजवता येत होती. ‘अल्फा दांडिया’ हा इव्हेंट, ‘सह्याद्री वाहिनी’वरील ‘महाराष्ट्राचा संगीतरत्न’ या कार्यक्रमात ढोलकीवादन, ‘मी मराठी’ वाहिनीवरील ’आपली आवड’ या कार्यक्रमाचे व्यवस्थापन त्याने सांभाळले होते.
रिऑलिटी शोमधील त्याच्या प्रवासाबद्दल तो सांगतो, ‘नीलेश परब द्वारे ‘घडलंय बिघडलंय’ या कार्यक्रमात ढोलकी वादनासाठी मला बोलावण्यात आले. मग ‘हास्यसम्राट’चा पहिला सीझन ऑक्टोपॅड वादक म्हणून, ‘फू बाई फू’चे नऊ सीझन्स संगीत संयोजक म्हणून केले. त्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत संयोजनासाठी ‘झी अवॉर्ड’सुद्धा मला मिळाले.’
तुषारने संगीतकार म्हणूनदेखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या शीर्षकगीताला व ‘संगीत शोले’ या नाटकाला त्याने संगीत दिले असून त्याला या नाटकासाठी ‘झी गौरव पुरस्कार’ मिळाला आहे. तुषारने स्वतःचा स्टुडिओदेखील सुरू केला आहे. तुषार म्हणतो, ‘एक संगीतकार म्हणूनदेखील मला यशस्वी व्हायचे आहे. मला भविष्यात नाटक, मालिका आणि चित्रपट या सर्व माध्यमांसाठी संगीतकार म्हणून काम करण्याची इच्छा आहे.’
‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या कार्यक्रमाकरिता अडीचशे भागांसाठी तुषारने संगीत संयोजक म्हणून काम केले. मुख्य म्हणजे, दर एपिसोडकरिता सुरुवातीची जी संगीत धून असते, ती प्रत्येक भागाला वेगळी असावी असा आग्रह ठेवून त्या पद्धतीने त्याने प्रत्येक भागाचे संगीत संयोजन केले. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या कार्पामाच्या पहिल्या सीझनकरिता ‘बँड लीडर’ होण्याची त्याला संधी मिळाली. त्यानिमित्ताने यातील स्पर्धक असणाऱया लहान मुलांना मार्गदर्शन करण्याचे कामदेखील त्याने केले. तुषार म्हणतो, ‘टीव्ही या माध्यमाची ताकद खूप आहे. या माध्यमातून तुम्ही रोज लोकांना दिसत असता.
शब्दांकन – गणेश आचवल




























































