
सामना ऑनलाईन । कोलकाता
रस्त्यावरील भटके कुत्रे माणसाला चावत असल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, दारूच्या नशेत माणसाने कुत्र्याचा चावा घेतल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. दारू पिऊन घरी परतत असताना अंगावर कुत्रे भुंकायला लागल्याचा राग आल्याने पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील एका मद्यपीने एका कुत्र्याला पकडून त्याच्या कानाचा चावा घेतला. कुत्र्यांच्या विव्हळण्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. घडलेली घटना समजल्यानंतर त्यांनी मद्यपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शंभूनाथ धाली असे कुत्र्याचा चावा घेणाऱ्या माणसाचे नाव आहे.
शंभूनाथ शहरात मजुरीचे काम करतो. काम संपल्यावर दररोज तो दारुच्या नशेत उत्तरापाडातील एका रस्त्याच्याकडेला झोपतो. रविवारी रात्री तो दारुच्या नशेत बरळत आला. त्यामुळे कुत्रे त्याच्यावर भुंकायला लागले. त्याचा त्रास झाल्याने रागाच्या भरात त्याने एका कुत्र्याला पकडले आणि त्याच्या कानाचा चावा घेतला. त्यामुळे कुत्र्याच्या कानातून रक्त वाहू लागले. वेदनेने तो विव्हळत होता. त्यामुळे इतर कुत्रेही भुंकत शंभुनाथवर धावून गेले. त्याने कसाबसा तेथून पळ काढला. या गोंधळामुळे नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यांना घटना समजली. त्यांनी शंभूनाथला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
शंभूनाथला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तोपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. शंभूनाथ दारूच्या नशेत परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्याचेही पोलिसांनी सांगितले.






















































