सोन्यात गुंतवणूक करताय? दागिन्यांऐवजी ‘हे’ स्मार्ट पर्याय निवडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सणासुदीच्या काळात सोने खरेदीला पसंती दिली जाते. मात्र, दागिन्यांच्या रुपात भौतिक सोने (Physical Gold) घरात ठेवणे जोखमीचे आणि खर्चिक ठरू शकते. त्याऐवजी, गुंतवणुकीला ‘सोनेरी मुलामा’ देण्यासाठी आधुनिक डिजिटल पर्यायांचा विचार करावा.

शेअर बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता, सोनं पोर्टफोलिओला स्थिरता देतं आणि महागाईपासून संरक्षण करतं. गेल्या दशकात सोन्याने वार्षिक १५ टक्क्यांपर्यंतचा उत्तम परतावा दिला आहे. भौतिक सोन्यातील चोरीचा धोका आणि लॉकरचा खर्च टाळण्यासाठी, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (इटीएफ) आणि गोल्ड इटीएफ फंड ऑफ फंड्स (एफओएफ) हे उत्तम पर्याय आहेत.

विशेषतः, गोल्ड एफओएफमध्ये (FoF) गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खात्याचीही गरज नसते. गुंतवणूकदार एसआयपी (SIP) द्वारे दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करू शकतात. यात सोन्याची शुद्धता किंवा सुरक्षित साठवणुकीची चिंता राहत नाही. त्यामुळे, या धनत्रयोदशीला संपत्ती निर्मितीसाठी पारंपरिक दागिन्यांऐवजी गोल्ड फंडात गुंतवणूक करणे हा एक ‘स्मार्ट’ मार्ग ठरू शकतो, असे बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत पिंपळे यांनी म्हटले आहे.

काय आहेत गुंतवणुकीचे ‘स्मार्ट’ पर्याय?

गोल्ड इटीएफ (Gold ETF) – हे एक प्रकारचे फंड आहेत जे शेअर बाजारात (Stock Market) खरेदी-विक्री केले जातात. त्यांची किंमत थेट सोन्याच्या दराशी जोडलेली असते. यात गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग खातं असणं आवश्यक आहे.

गोल्ड इटीएफ फंड ऑफ फंड्स (FOF) – हा सामान्य आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अतिशय सोपा मार्ग आहे. यासाठी डिमॅटची गरज नाही. ज्यांच्याकडे डिमॅट खातं नाही, तेसुद्धा यात गुंतवणूक करू शकतात. विशेष म्हणजे यात SIP करता येते. तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम (SIP) गुंतवून हळूहळू सोनं जमा करू शकता. तसेच सोनं खरेदी करणं, त्याची शुद्धता तपासणं, ते सुरक्षित ठेवणं यांसारख्या अडचणी या डिजिटल पर्यायामुळे दूर होतात. तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होते.