कॉमनवेल्थ गेम्सवर आयओएचा बहिष्कार; बर्मिंगहॅम स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्याचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने कार्यकारी समितीच्या बैठकीत 2022 सालामध्ये बार्ंमगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समधून शूटिंग अर्थातच नेमबाजी या खेळाला वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा फटका हिंदुस्थानला बसला आहे. नेमबाजी या खेळामधून हिंदुस्थानी खेळाडू पदकांची लयलूट करीत असतात. त्यामुळे आगामी गेम्समध्ये पदकसंख्येत घट होणार हे निश्चित. हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनकडून (आयओए) या प्रकरणाचा निषेध करण्यात आला आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनच्या जनरल असेम्बलीमधून ‘आयओए’ने माघार घेतल्यानंतर आता बर्मिंगहॅम गेम्सवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ‘आयओए’चे प्रमुख नरींदर बत्रा यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेण रिजीजू यांनाही याबाबत पत्र लिहून कळवले आहे.

आता सर्व काही संपले

राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी राजीव भाटीया यावेळी म्हणाले, आम्ही नेमबाजीला स्पर्धेत कायम राहण्यासाठी प्रयत्न केले, पण आयोजकांनी यावर अंतिम निर्णय घेतलाय. आता काही करू शकत नाही. सर्व काही संपले आहे.

दबावतंत्राचा वापर

नरींदर बत्रा यांनी क्रीडा मंत्र्यांना पत्र लिहून बहिष्कारबाबतचा निर्णय कळवला आहे. या पत्रात सविस्तर पद्धतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नेमबाजी वगळल्याचा तोटा हिंदुस्थानला कशा प्रकारे होऊ शकतो हेही सिद्ध करण्यात आले आहे. यावेळी हिंदुस्थान मोठा देश असून या स्पर्धेतून बहिष्कार घेतल्यास कॉमनवेल्थ फेडरेशनला धडा मिळेल असा सूर काही खेळाडूंकडून व्यक्त करण्यात आला आहे. दबावतंत्राचा वापर केल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

गोल्ड कोस्टमध्ये 16 पदकांची कमाई

हिंदुस्थानच्या नेमबाजांनी 2018 साली ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 16 पदकांची कमाई केली होती. यामध्ये सात खेळाडूंनी गोल्ड मेडलवर हक्क सांगितला होता.