आशियाई क्रीडा स्पर्धा – हिंदुस्थानी कुस्तीपटूंच्या खेळण्याबाबत संदिग्धता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी कुस्तीपटूंच्या खेळण्याबाबत अजूनही संदिग्धता आहे. कारण क्रीडा मंत्रालय, साई, हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशन व राष्ट्रीय कुस्ती महासंघ यापैकी कोणालाच अद्यापि कुस्तीपटूंची चाचणी स्पर्धा कधी होणार, याची माहिती नाहीये. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीपटूंची अंतिम यादी पाठविण्याची मुदत 23 जुलै आहे. मात्र, अद्यापि कुस्ती स्पर्धेची चाचणी स्पर्धाच झालेली नाही.

दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीपटूंची अंतिम यादी पाठविण्यासाठी 15 जुलै अंतिम तारीख होती. मात्र, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) 23 जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली होती. आशियाई ऑलिम्पिक समितीने या मुदतवाढीस परवानगी दिली होती. मात्र, ‘डब्लूएफआय’ने आता कुस्तीपटूंची नावे पाठविण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत मागितली आहे. आशियाई ऑलिम्पिक समितीकडून या मुदतवाढीस अद्यापि ग्रीन सिग्नल दिलेला नाहीये. त्यामुळे कुस्तीपटूंच्या आशियाई स्पर्धेतील सहभागाबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे.

ऑलिम्पिक कौन्सिलकडून अद्यापि उत्तर नाही

हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीपटूंची नावे पाठविण्यासाठी आणखी मुदतवाढ मागितली आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून (ओसीए) मुदतवाढ मिळाली, तर राष्ट्रीय कुस्ती महासंघ 5 ते 15 ऑगस्टदरम्यान चाचणी स्पर्धा घेणार आहे. मात्र, ‘आयओए’ च्या मागणीवर ‘ओसीए’ने अद्यापि उत्तर दिलेले नाही. ही मुदतवाढ मिळाली तरच हिंदुस्थानी कुस्तीपटूंचा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आंदोलक कुस्तीपटूंसाठी पाहिजे मुदतवाढ

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करीत काही कुस्तीपटूंनी आंदोलनाचा ठोकला होता. या आंदोलनात दोन महिन्यांचा कालावधी गेल्याने संबंधित कुस्तीपटूंना सरावासाठी वेळ मिळाला नाही. या आंदोलनात बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट, संगीता फोगाट, सत्यवर्त कादियन, जितेंद्र किन्हा असे आघाडीचे मल्ल सहभागी झाले होते. या कुस्तीपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी खेळाडूंची यादी पाठविण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागण्यात आली आहे.

पी. टी. उषांची बैठकीसाठी बँकॉकवारी

हिंदुस्थान ऑलिम्पिक समितीच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा व सेक्रेटरी कल्याण चौबे यांनी 8 जुलैला आशियाई ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसाठी बँकॉकला गेले होते. हिंदुस्थानी कुस्तीपटूंची अंतिम यादी देण्यासाठी त्यांनी 15 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ मागितली होती. मुदतवाढ मिळाल्यास 10 ऑगस्टपर्यंत कुस्तीपटूंची चाचणी स्पर्धा घेण्याचा ‘आयओए’ चा मानस आहे. मात्र, ‘ओसीए’कडून अद्यापि मुदतवाढ मिळालेली नाहीये.