
हिंदुस्थानातील वाढत्या कोरोनामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला असला तरी बीसीसीआय ‘आयपीएल टू’ अर्थातच उर्वरीत मोसमाच्या आयोजनासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. याप्रसंगी यूएई हा त्यांच्यासमोर पर्याय आहे. पण आणखी दोन पर्यायांचा विचार बीसीसीआय, आयपीएल गव्हर्निंग समिती व या स्पर्धेशी निगडीत सर्वच व्यक्ती करीत आहेत. याप्रसंगी यूएईसह युके (युनायटेड किंगडम, इंग्लंड) व ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये आयपीएल आयोजनासाठी विचारमंथन सुरू आहे. प्रसारमाध्यमांमधून याबाबतचे वृत्त समोर आले आहे.
पर्याय एक – आयपीएलचा मागील मोसम यूएईमध्ये पार पडला होता. हा मोसम विनाअडथळा यशस्वी पार पडला होता. आता आयपीएलचा यंदाचा उर्वरीत मोसम तिथेच आयोजित करण्यात येऊ शकतो. हिंदुस्थानातील कोरोनाचा कहर कमी झाला नाही तर टी-20 वर्ल्ड कपचेही आयोजन तेथे करण्यात येऊ शकते. हिंदुस्थानचा इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर आयपीएलसाठी हिंदुस्थानीसह परदेशातील सर्व खेळाडू यूएईकडे रवाना होऊ शकतील. तसेच आयपीएल संपल्यानंतर टी-20 वर्ल्ड कपसाठी तेथेच राहू शकतील. अर्थात यावेळी टी-20 वर्ल्ड कपचे स्थळ बदलण्यात आल्यास सर्व काही बदलेल.
पर्याय दोन – हिंदुस्थानचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर इंग्लंड दौऱयावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर टी-20 वर्ल्ड कप आयोजनापर्यंत (ऑक्टोबर – नोव्हेंबर) बीसीसीआयला आयपीएलच्या उर्वरीत मोसमातील लढती खेळवण्यात येऊ शकतात. इंग्लंडमध्येच हा मोसम पार पडू शकेल. इंग्लंडमधील क्रिकेट लढतीची वेळ हिंदुस्थानसाठीही योग्य ठरू शकेल. तसेच हिंदुस्थानी खेळाडूंसाठी इंग्लंडमधील बायोबबलनंतर थेट यूएईमधील बायोबबलमध्ये जाता येईल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी खेळाडूंसाठीही इंग्लंडचा पर्याय योग्य ठरू शकतो.
पर्याय तीन – हिंदुस्थानात सध्या कोरोना असल्यामुळे या वर्षअखेरीस येथे आयोजित करण्यात येणारा टी-20 वर्ल्ड कप बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत अदलाबदली करायला हवा. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियाला करायला देऊन 2022 सालातील टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाचा मान बीसीसीआयने मिळवायला हवा. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आयपीएलच्या उर्वरीत लढती खेळवण्यात येऊ शकतील. सध्या बीसीसीआयकडे हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.




























































