#IPL2019 मुंबईला फायनलचे तिकीट, चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hardik-pandya-ipl-mumbai

सामना ऑनलाईन । चेन्नई

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या पहिल्या प्ले ऑफ लढती मध्ये मुंबईने चेन्नईच्या 6 विकेटने पराभव करत अंतिम सामन्यात धडक दिली. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 132 धावांचा मुंबईने यशस्वी पाठलाग करत 19 व्या षटकात विजय मिळवला. मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला सुर्यकुमार यादव. सुर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरत अर्धशतकीय खेळी केली आणि नाबाद राहात संघाला विजय मिळवून दिला.

याआधी आयपीएलच्या 12 व्या मोसमातील पहिल्या ‘प्ले ऑफ’ सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 132 धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईकडून सर्वाधिक धावा रायडूने (42) केल्या. धोनीने 29 चेंडूत 37 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने 3 उत्तुंग षटकार लगावले. मुंबईकडून राहुल चहरने दोन, कृणाल पांड्या आणि जयंत यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.

फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईच्या विकेट्स घेत धावगतीला ब्रेक लगावला. अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि रायडूने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु 20 षटकात चेन्नईचा संघ 4 बाद 131 धावा करू शकला.