IPL 2020 – ‘करो या मरो’ लढतीत राजस्थानचा 7 विकेट्सने विजय, पराभवामुळे चेन्नईचे गणित बिघडले

‘करो या मरो’ लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 7 विकेट्सने पराभव करत आयपीएल 2020 स्पर्धेतील आव्हान कायम राखले. मात्र 10 लढतीत सातवा पराभव सहन करावा लागल्याने चेन्नईचे गणित मात्र बिघडले असून धोनीचा संघ जवळपास प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर फेकल्यात जमा आहे.

सोमवारी झालेल्या लढतीत चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 125 धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नई कडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 35 आणि 200 वा सामना खेळणाऱ्या धोनीने 28 धावांची खेळी केली.

चेन्नईने विजयासाठी दिलेल्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. बेन स्टोक्स 19, रॉबिन उथप्पा 4 आणि संजू सॅमसन शून्य धावावर बाद झाले. चेन्नईने ‘कमबॅक’ केले असे वाटले, मात्र यानंतर मैदानात आलेल्या जोस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी अभेद्य भागीदारी करत संघाला 16 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. जोस बटलरने नाबाद 70 आणि स्मिथने नाबाद 26 धावा केल्या.

200 वा सामना
चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी याचा हा 200 वा सामना होता. या लढतीत त्याने 28 धावा केल्या. तसेच चेन्नईकडून खेळताना आयपीएलमध्ये 4000 धावा आणि विकेटमागे बळींची दीडशतक पूर्ण केले. मात्र या खास लढतीत तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या