दाक्षिणात्य संघांमध्ये काँटे की टक्कर, आज बंगळुरू – हैदराबाद भिडणार

आयपीएलमध्ये सोमवारी दोन दाक्षिणात्य संघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सेना डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद ब्रिगेडला यावेळी भिडणार आहे. दोन संघांमधील ही लढत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडेल. दोन्ही संघ विजयी सलामी देण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील. सनरायझर्स हैदराबादने 2016 साली चॅम्पियन होण्याचा मान संपादन केलाय, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

परदेशी खेळाडूंकडून अपेक्षा

सनरायझर्स हैदराबाद संघाला परदेशी खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टॉ, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श, अफगाणिस्तानचा फिरकीवीर राशीद खान यांनी आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी केल्यास उद्याच्या लढतीत या संघाला विजय मिळू शकतो. याचसोबत भुवनेश्वरकुमार, संदीप शर्मा, मनीष पांडे, खलील अहमद, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल या हिंदुस्थानी खेळाडूंमध्येही चांगली कामगिरी करण्याची क्षमता नक्कीच आहे.

विराट, डिव्हिलियर्सवर साऱयांच्या नजरा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली असून त्याच्याच खांद्यावर संघाचे नेतृत्व आहे. त्यामुळे साहजिकच तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा या संघाच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. त्याच्यासोबत ए. बी. डिव्हिलियर्स हा स्टार फलंदाजही या संघात आहे. याशिवाय ऍडम झाम्पा, युजवेंद्र चहल, मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही दिमतीला आहेत. सायमन कॅटीच्या मार्गदर्शनात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

बंगळुरूसाठी प्रतिष्ठेची लढाई

विराट कोहलीने जगभरातून धावांचा पाऊस पाडलाय. त्याच्या नेतृत्वात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्मरणीय कामगिरी केलीय. पण तो नेतृत्व करीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मात्र अद्याप या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही ही खेदजनक बाब. त्यामुळे यंदाच्या मोसमातही प्रत्येक लढत त्याच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या